राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची ‘पुरस्कार वापसी’

By admin | Published: November 6, 2015 02:05 AM2015-11-06T02:05:29+5:302015-11-06T02:05:29+5:30

चित्रपट क्षेत्रातील विविध गटांत राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या २४ कलाकारांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेसह एफटीआयआयच्या वादाचा निषेध म्हणून पुरस्कार परत केले

National award winners 'award return' | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची ‘पुरस्कार वापसी’

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची ‘पुरस्कार वापसी’

Next

मुंबई : चित्रपट क्षेत्रातील विविध गटांत राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या २४ कलाकारांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेसह एफटीआयआयच्या वादाचा निषेध म्हणून पुरस्कार परत केले आहेत. मुंबई प्रेस क्लबमध्ये बुधवारी पत्रकार परिषद घेत काही मान्यवरांनी पुरस्कार परत करण्याची घोषणा करतानाच मनातील खदखदही व्यक्त केली.
पुरस्कार परत करणाऱ्यांत बहुतेक जण हे पुण्यातील एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. पुरस्कार परत करतानाच त्याची रक्कम ही चॅरिटीसाठी वापरण्याचा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला आहे. सईद मिर्झा, कुंदन शाह, मधुश्री दत्ता, पीएम सथीश, सत्य राय नागपाल या कलाकारांसह रफिक इलियास यांची प्रतिनिधी विणा सरकार यावेळी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी एफटीआयआयच्या सर्वोच्च पदावर गजेंद्र चौहान यांची केलेली निवड आणि आंदोलनकर्त्यांना विद्यार्थ्यांचे होत असलेले शोषण जिव्हारी लागल्याचे मत व्यक्त केले.
देशातील चित्रपट निर्मितीचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या सर्वोच्च पदावर चित्रपटाचे ज्ञान नसलेल्या व्यक्तीला बसवल्याने देशाच्या चित्रपट निर्मितीवर विपरित परिणाम होणार असल्याचे मत संस्थेचे माजी अध्यक्ष सईद मिर्झा यांनी व्यक्त केले. एफटीआयआयसोबतच विविध सांस्कृतिक आणि कला संस्थांतील महत्त्वाच्या पदांवर सरकार ठराविक मानसिकतेच्या पात्रता नसलेल्या लोकांची निवड करत आहे, असा आरोप ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शाह यांनी केला. एफटीआयआयचा संप मागे घेतला असला, तरी लढाई संपलेली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

यांनी नोंदविला निषेध...
विरेंद्र सैनी, सईद मिर्झा, कुंदन शाह, अरुंधती रॉय, रंजन पलीत, तपन बोस, श्रीप्रकाश, संजय काक, प्रदीप क्रिशेन, तरुण भारतीय, अमिताभ चक्रवर्ती, मधुश्री दत्ता, अन्वर जमाल, अजय रैना, आयरिन दार मलिक, पीएम सथीश, सत्य राय नागपाल, मनोज लोबो, रफिक इलिआस, सुधीर पल्साने, विवेक सच्चिदानंद, सुधाकर रेड्डी यक्कांती, डॉ. मनोज निथरवाल, अभिमन्यू डांगे

एफटीआयआयमध्ये प्रशिक्षण घेताना तयार केलेल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मात्र या संस्थेबाबत सरकारमधील नेत्यांमधून उमटणाऱ्या प्रतिक्रियांमुळे दुखावलो गेलो.
- विवेक सच्चिदानंद, राष्ट्रीय पुरस्कार विजेते

कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संस्था आणि सामाजिक संस्थेवर सरकारने हल्ला चढवला आहे. शाब्दिक हल्ल्यांनी कलाकारांना टार्गेट केले जात आहे. यावरून येत्या काळात किती भयंकर परिस्थिती उद्भवणार आहे, याची चाहूल लागते.
- सत्य राय नागपाल, राष्ट्रीय पुरस्कार विजेते

कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एवढ्या असंतोषानंतरही पंतप्रधानांनी बाळगलेले मौन अयोग्य आहे. ज्युरींचा मान ठेवून पुरस्कार परत करत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आत्मपरिक्षण करून एखादा निर्णय चुकीचा वाटत असेल, तर तो मागे घेण्यास काहीच हरकत नाही.
- आयरिन दार मलिक, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या

देशातील वाढती असहिष्णुता आणि प्रत्येक अधिक गमावण्याची भीती निर्माण झाल्याने आत्तापर्यंतचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत करत आहे. कलबुर्गी, पानसरे, दाभोलकर आणि महत्त्वाच्या विचारवंतांच्या हत्या होत असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता देश एकसंघ झाल्यानंतरच पुरस्कार स्वीकारायला आवडेल.
- मधुश्री दत्ता,
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या

Web Title: National award winners 'award return'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.