जादा पैसे मोजा अन् सिलिंडर घेऊन जा!

By admin | Published: May 7, 2016 05:19 AM2016-05-07T05:19:53+5:302016-05-07T05:19:53+5:30

कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कार्ड देण्यासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या गॅस एजन्सीच्या ‘डिलिव्हरी बॉय’ला जास्त रक्कम मोजल्यास एकही कागदपत्र नसतानाही सहजरीत्या

Take extra money and take cylinders! | जादा पैसे मोजा अन् सिलिंडर घेऊन जा!

जादा पैसे मोजा अन् सिलिंडर घेऊन जा!

Next

- मंगेश पांडे, सुवर्णा नवले, पिंपरी

कागदपत्रांची पूर्तता नसल्याने कार्ड देण्यासाठी हेलपाटे मारायला लावणाऱ्या गॅस एजन्सीच्या ‘डिलिव्हरी बॉय’ला जास्त रक्कम मोजल्यास एकही कागदपत्र नसतानाही सहजरीत्या गॅस उपलब्ध होतो. गॅस सिलिंडरचा हा काळाबाजार ‘लोकमत टीम’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आला.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीन लाख गॅसग्राहक आहेत. या ग्राहकांना विविध कंपनींच्या एजन्सीमार्फत गॅसचा पुरवठा केला जातो. निवासाचा पुरावा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे सादर केल्यानंतर अधिकृत गॅसजोड दिला जातो. दर महिन्याला गॅस सिलिंडरची किंमत निश्चित केली जाते. निश्चित केलेल्या किमतीत ग्राहकाने सिलिंडर घेतल्यानंतर त्यावरील सबसिडी ग्राहकाच्या बँक खात्यात जमा होते. अशाप्रकारे अधिकृतरीत्या सिलिंडरची खरेदी केली जाते.
तर दुसरीकडे कामानिमित्त राज्याच्या विविध भागांतून शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेकजण कुटुंबासह येथे येतात. अशा कुटुंबांना सिलिंडरची आवश्यकता असते. मात्र, त्यांच्याकडे पूर्ण कागदपत्रे नसतात. अशावेळी सिलिंडरचा काळाबाजार केला जातो. तसेच वर्षाला ठरवून दिलेला बारा सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर अधिकचे सिलिंडर घेण्यासाठीही सबसिडीचा विचार न करता पूर्ण रक्कम भरून सिलिंडर घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय एजन्सीच्या कार्यालयातील कर्मचारी सिलिंडर देत नसल्याचे सांगितले जात असले, तरी ‘डिलिव्हरी बॉय’कडून मात्र सहजरीत्या सिलिंडर उपलब्ध होत आहे. सिलिंडर घेताना ‘डिलिव्हरी बॉय’ सांगेल ती किंमत त्याला अदा करावी लागत आहे. शहरातील प्रत्येक ‘एरिया’ व गॅस कंपनीनुसार सिलिंडरची किंमत ठरविली जाते. शहरात नामांकित कंपनीच्या गॅस एजन्सीसह इतरही एजन्सी आहेत. या कंपन्यांच्याच सिलिंडरची डिलिव्हरी होत असतात. गॅस डिलिव्हरीची रिक्षा फिरत असताना ठिकठिकाणी सिलिंडरबाबत अनेकांकडून विचारणा होत असते. त्या वेळी गॅस नोंदणीपुस्तिका असलेल्या ग्राहकाला निश्चित केलेल्या किमतीत सिलिंडर दिला जातो. मात्र, कसलीही कागदपत्रे, नोंदणीपुस्तिका नसलेल्यांनादेखील सिलिंडर सहजरीत्या उपलब्ध होतो.
यासाठी रिक्षावरील डिलिव्हरी बॉयला फिरतीवर असतानाच
गाठावे लागत असल्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये स्पष्ट झाले. एजन्सीच्या कार्यालयात नका जाऊ, माझा फोन
नंबर घेऊन मलाच भेटा अशी उत्तरे डिलिव्हरी बॉयकडून मिळत होती. कोणतीही कागदपत्रे नसतानाही
सिलिंडर घेण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात गेलो असता, कार्यालयात जाऊ नका इथेच थांबा, अशी उत्तरेही त्यांच्याकडून मिळत होती.

एका सिलिंडरमागे उकळले जातात ५०० ते ६०० रुपये
१) कोणतीही कागदपत्रे नाहीत की ओळखपत्रही नसून सिलिंडर मिळेल का, याबाबत विचारणा केल्यास ‘डिलिव्हरी बॉय’कडून ठामपणे सिलिंडर देण्याबाबत सांगितले जाते. काहीही काळजी करू नका. हजार रुपये द्या, सिलिंडर आणून देतो असे सांगितले जाते. अशाप्रकारे ग्राहकाकडून एका सिलिंडरमागे तब्बल पाचशे ते सहाशे रुपये उकळले जातात.
२) अधिकृत गॅसधारकाला कार्डवर सिलिंडर घेताना तो राहत असलेल्या ठिकाणाहून घेण्यास सांगितले जाते. मात्र, तोच सिलिंडर काळ्याबाजरातून अधिक पैसे देऊन घ्यायचा असल्यास इतर हद्दीतील डिलिव्हरी बॉयकडून देखील उपलब्ध होतो.
३) सध्या गॅस सिलिंडरची किंमत साडेपाचशे रुपये आहे. त्यावरील सुमारे ७५ रुपये सबसिडी ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा होते. त्यामुळे अधिकृत ग्राहकाला एक गॅस सिलिंडर सुमारे साडेचारशे रुपयांना मिळतो. मात्र, काळ्या बाजारात याच सिलिंडरची किंमत आठशे रुपयांपासून तेराशे रुपयांपर्यंत लावली जाते.
४) अनेक वेळा वारंवार फोन करूनही सिलिंडर मिळत नाही. घरपोच सिलिंडर दिल्याल छापील पावतीपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जाते. याबाबत एजन्सीकडे तक्रार केल्यास हा प्रश्न वैयक्तिक असून, संबंधित कर्मचाऱ्याशीच संपर्क साधा अथवा सेंटरवर येऊन सिलिंडर घेऊन जावा, असा सल्ला दिला जातो.

दुपारी १.०५ मि.
चिंचवड येथील राजे छत्रपती माध्यमिक विद्यालयाशेजारी असलेल्या गॅस एजन्सीजवळ ‘लोकमत’ प्रतिनिधी पोहोचले. दरवाजात उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाने प्रतिनिधींना अडवले. त्यानंतर प्रतिनिधी म्हणाले, ‘‘सध्या खराळवाडीत राहत आहे. आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. पण गॅस सिलिंडर हवा आहे.’’ त्यावर सुरक्षारक्षक म्हणाला, ‘अशा प्रकारे बेकायदा सिलिंडर मिळत नाही.’ प्रतिनिधी थोड्या अंतरावर जाऊन उभे राहिले. काही वेळाने सुरक्षारक्षकाने त्यांना बोलावून घेतले. एका डिलिव्हरी बॉयला आवाज देत यांना सिलिंडर पाहिजे असे सांगितले. घाबरतच तो डिलिव्हरी बॉय आला आणि दबक्या आवाजात बाजूला चला असे म्हणाला, ‘सिलिंडर मिळेल मात्र, इथे नाही. आठशे रुपये होतील. माझा मोबाइल नंबर घेऊन मला फोन करा, माझे आडनाव शिंदे आहे’.

दुपारी १.३५ मि.
नेहरुनगर येथील संतोषीमाता चौकाकडून झीरो बॉईज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिलिंडरची रिक्षा उभी होती. तेथील एका कंपनीला सिलिंडर वितरीत करण्यासाठी ती रिक्षा आली होती. तिथे उभ्या असणाऱ्या डिलिव्हरी बॉयला सिलिंडर मिळेल का, अशी विचारणा केली असता, त्याने गॅस कार्डची मागणी केली. मात्र, प्रतिनिधींनी गॅसकार्ड नसल्याचे सांगितले. डिलिव्हरी बॉय म्हणाला, ‘काही हरकत नाही, रिकामा सिलिंडर घेऊन या, आठशे रुपये होतील.’ प्रतिनिधींनी सिलिंडर कुठे घेऊन असे विचारले असता तो म्हणाला, ‘‘हा माझा मोबाइल नंबर घ्या मला फोन करा. एजन्सीकडे सिलिंडर मिळत नाही. मी घरी सिलिंडर आणून देतो. फक्त कोणाला काही बोलू नका.’’

दुपारी २.१० मि.
भोसरी, एमआयडीसीतील टी ब्लॉक येथील गॅस एजन्सीच्या जवळच असलेल्या सिलिंडरच्या गोदामाच्या दिशेने प्रतिनिधी गेले. त्या ठिकाणी एक व्यक्ती खूर्ची टाकून बसली होती. प्रतिनिधी म्हणाले, ‘काका आम्हाला सिलिंडर हवा आहे. मात्र, आमच्याकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत. त्यावर ते म्हणाले, ‘सिलिंडर लगेच भेटेल, पण ‘ब्लॅक’ने किती दिवस सिलिंडर वापरणार. दुप्पट पैसे द्यावे लागतात. त्यासाठी सिलिंडर ट्रान्सफर करून घ्या नाहीतर नवे कनेक्शन घ्या.’’

दुपारी ३.०५ मि.
पिंपळेगुरव येथील पाण्याच्या टाकीच्या मागे असलेल्या गॅस एजन्सीमध्ये लोकमत प्रतिनिधी पोहोचले. तेथील वाहनचालकाकडे सिलिंडरबाबत विचारणा केली असता, त्याने लगेचच होकार दिला. मात्र, डिलिव्हरी बॉय खूप काळाबाजार करतात. जवळपास १२०० ते १३०० रुपये सिलिंडरसाठी लागतील, असे त्याने सांगितले. त्यापेक्षा तुम्ही अधिकृत गॅसजोड घ्या.

Web Title: Take extra money and take cylinders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.