हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच ‘यार्डात’
By admin | Published: May 10, 2016 12:40 AM2016-05-10T00:40:15+5:302016-05-10T00:40:15+5:30
अनेक वर्षांपासून रेगाळलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच यार्डात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल येत्या १५ जुलैपर्यंत सादर करा
पुणे : अनेक वर्षांपासून रेगाळलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच यार्डात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल येत्या १५ जुलैपर्यंत सादर करा, असे आदेश पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल कॉरपोरेशनला सोमवारी दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासंदर्भांत पीएमआरडीएच्या कार्यालयात झगडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवरी दिल्ली मेट्रोचे सर्व तज्ज्ञ अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापीकय प्रमुख, पर्यावरण विभागाचे तज्ज्ञ, एमआयडीसीचे प्रमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झगडे यांनी अहवाल १५ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले.
पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराच्या हद्दीबाहेरील रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पाचा समावेश आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प १७ किलोमीटरचा असून, तो संपूर्ण इलेव्हेटेड असेल. डीएमआरसी कंपनीकडून सर्वेक्षणाचे कामपूर्ण झाले आहे. (प्रतिनिधी)