सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही : भाई वैद्य
By admin | Published: November 18, 2016 06:25 AM2016-11-18T06:25:57+5:302016-11-18T06:25:57+5:30
केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य
पिंपरी : केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी निर्धार परिषदेत व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगार पंचायत संघटनेतर्फे असंघटित कष्टकरी कामगारासांठी आयोजित निर्धार परिषदेत वैद्य बोलत होते.
वैद्य म्हणाले, विविध क्षेत्रांतील कामगारांना आज दैनंदिन जीवन जगणेदेखील अवघड झाले आहे. अनेक वर्षांपासून मागणी असूनदेखील त्यांच्या घरांचा, नोकरीचा प्रश्न सुटलेला नाही. अशा प्रकारे एकीकडे कामगारांवर अन्याय होत असताना, दुसरीकडे मात्र, उद्योजकांना करामध्ये सवलती देण्यात येत आहेत. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत आहेत. सरकारने चलनातून हजार -पाचशेच्या नोटा रद्द केल्याने, याचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. सकाळपासूनच नागरिक त्यांच्याकडील तुटपुंजी रक्कम बदलण्यासाठी बँकांसमोर रांगा लावत आहेत. (प्रतिनिधी)