गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविल्यास उद्रेक
By admin | Published: January 10, 2017 04:00 AM2017-01-10T04:00:36+5:302017-01-10T04:00:36+5:30
छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी विकृत लेखन करणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात उद्रेक होईल
पुणे : छत्रपती संभाजीमहाराज यांच्याविषयी विकृत लेखन करणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसविण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात उद्रेक होईल. मराठा मोर्चांचे रूपांतर क्रांती मोर्चांमध्ये होईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी उद्यानात संभाजीमहाराज यांचाच पुतळा बसविला पाहिजे. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, अशी मागणीही करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेत गडकरी पुतळा काढण्यामागील भूमिका स्पष्ट केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडने गेली १०-१२ वर्षे हा पुतळा हटवावा, यासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी वैयक्तिक भूमिकेतून तो काढून टाकावा, यासाठी उद्यान विभागाला पत्र लिहिले होते. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. कार्यकर्त्यांनी या दिरंगाईमुळे स्वत:च पुतळा काढला. त्यांचा आम्हाला अभिमान असून आम्ही ती जबाबदारी स्वीकारली आहे.’’
निवडणूक लक्षात घेऊन गडकरी पुतळा हा विषय संभाजी ब्रिगेडने चर्चेत आणल्याची चर्चा खरी नाही. संघटना पुतळ्याचा आधार घेऊन राजकारण करण्याएवढी कमकुवत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व महापौर प्रशांत जगताप यांनी गडकरींचा पुतळा परत बसविण्याचे किंवा तैलचित्र बसविण्याचे जाहीर केले असल्यामुळे गडकरींच्या लेखनाला या पक्षाचे समर्थन असल्याचे दिसून येते, असे शिंदे यांनी सांगितले.
वयाच्या १४व्या वर्षी ‘बुधभूषणम्’सारखा संस्कृत ग्रंथ लिहिणारे संभाजीमहाराज आदर्श राजा कसा असावा असे लिहीत असतील, तर त्यांचे चारित्र्य शुद्धच असले पाहिजे. एकही लढाई ते हरले नाहीत. गडकरींनी रंगविलेल्या तुळसा या काल्पनिक पात्राचे थडगे पन्हाळा गडावर नसल्याचे संशोधकांना दिसून आले आहे, असे मिटकरी यांनी नमूद केले.(प्रतिनिधी)