कुख्यात गुंड विठ्ठल शेलार भाजपाच्या आश्रयाला

By Admin | Published: January 11, 2017 02:32 AM2017-01-11T02:32:34+5:302017-01-11T02:32:34+5:30

मुळशीतील गुन्हेगारी जगतात दहा वर्षांपासून सक्रिय असलेला तसेच खंडणी, दंगा-दुखापत करणे, अपहरण, दरोड्याची तयारी

The infamous Gund Vitthal Shelar, the shelter of BJP | कुख्यात गुंड विठ्ठल शेलार भाजपाच्या आश्रयाला

कुख्यात गुंड विठ्ठल शेलार भाजपाच्या आश्रयाला

googlenewsNext

 पुणे : मुळशीतील गुन्हेगारी जगतात दहा वर्षांपासून सक्रिय असलेला तसेच खंडणी, दंगा-दुखापत करणे, अपहरण, दरोड्याची तयारी, हाफ मर्डर, खून यासारख्या गुन्ह्यांत अडकल्याने प्रशासनाकडून सन २०१४मध्ये मोक्काखाली कारवाई झालेला आणि सध्या जामिनावर सुटलेला मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याने पिरंगुट येथे भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
हा प्रवेशही खुद्द पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाळा भेगडे, माजी आमदार शरद ढमाले यांच्या उपस्थितीत झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शेलार याने भाजपात प्रवेश केला व त्याला लागलीच पक्षाचे भोर- मुळशी- वेल्ह्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मुळशीतील भालवडी गावात त्याचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर झाला. पक्षप्रवेश सोहा भालवडी गावात पार पडला. यावेळी शेलार टोळीतील गुंडही उपस्थित होते. माऩ्यवरांसमवेत काढलेली छायाचित्रे शेलारने फेसबुकवरही टाकली आहेत. चार महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटून आल्यानंतर विठ्ठल शेलार आपल्या माण येथील एका मित्राच्या वाढदिवसाच्या वेळी उपस्थित असताना त्याने विनापरवाना शस्त्र बाळगल्याच्या कारणावरून त्याला पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतरही तो जामिनावर सुटून आला होता.
मूळचा बोतरवाडी (ता. मुळशी) येथील रहिवासी असलेला विठ्ठल शेलार याने मारणे टोळीशी संघर्ष करून अल्पावधीतच मुळशीत आपला दबदबा निर्माण केला होता.  मुळशी तालुका व शहर पोलीस चौकीला शेलार याच्या नावावर पिंटू मारणे याच्या खुनासह अन्य दोन खुनांबरोबरच इतरही अनेक गुन्हे असताना स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भाजपाने शेलार याला पक्षात प्रवेश दिल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बेकायदेशीररीत्या जमिनींचा  कब्जा घेत असल्याची तक्रार त्याच्या टोळीविषयी आहे.

Web Title: The infamous Gund Vitthal Shelar, the shelter of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.