महिला पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत

By admin | Published: June 2, 2017 02:54 AM2017-06-02T02:54:52+5:302017-06-02T02:54:52+5:30

संधी दिली तर महिला उत्कृष्ट काम करू शकतात. लष्करापासून सर्वत्र आज महिलांसाठी संधी निर्माण झाली असून, आपण पुरुषांपेक्षा कुठेही

Women are not short in any field than men | महिला पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत

महिला पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संधी दिली तर महिला उत्कृष्ट काम करू शकतात. लष्करापासून सर्वत्र आज महिलांसाठी संधी निर्माण झाली असून, आपण पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अशी संधी देण्याचा पहिला निर्णय घेता आला याचा आनंद आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.
महिलांसाठी आरक्षण या निर्णयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यातील महिलांच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार व प्रतिभा पवार यांचा गौरव करण्यात आला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार वंदना चव्हाण, महापौर मुक्ता टिळक तसेच पुण्यातील विविध माजी महिला महापौरांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. खासदार सुप्रिया सुळे, रजनी पाटील, माजी केंद्रीय कृषी सचिव राधा सिंग तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला प्रतिनिधी या वेळी उपस्थित होत्या.
पवार म्हणाले, महिलांना कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेतच स्थान नव्हते तर समाजकारण, राजकारणात कुठून असणार? ते देता आले याचे समाधान आहे. कर्तृत्व फक्त पुरुषांतच नसते हे महिलांनी सिद्ध केले आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे या कर्तृत्ववान महिलांनी त्याचा पाया घातला होता. सरकारी धोरणात ते बसवता आले तर त्याचा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग होईल असा विचार होता. तो बरोबर होता ते सिद्ध झाले आहे. आता सैन्यातही आरक्षण आहे. तिथेही त्यांनी कर्तृत्व दाखवले आहे.
महिला धोरण लागू झाल्यानंतर प्रथमच पदाधिकारी झालेल्या निर्मला सामंत-प्रभावळकर (मुंबई), कमल व्यवहारे (पुणे), अनिता फरांदे (पिंपरी-चिंचवड) या माजी महापौरांचा तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिता कोकरे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
संयोजक खासदार चव्हाण यांनी प्रास्तविक केले व महिला धोरणामुळे झालेल्या गेल्या २५ वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी यापुढे लोकसभा, विधानसभा यातही महिलांसाठी आरक्षण व्हावे म्हणून पवार यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्याला सभागृहात उपस्थित सर्व महिला तसेच पुरुषांनाही हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला. पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या समस्त महिलांनी लिहिलेल्या पत्राचे वाचन मनाली भिलारे यांनी केले.
आयसीएसईत देशात पहिली आलेल्या मुस्कान पठाणचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली बनकर यांनी आभार मानले.

संसदीय कारकिर्दीची ५० वर्षे वैशिष्ट्यपूर्ण

माजी राष्ट्रपती पाटील यांनी पवार यांचा दूरदृष्टीचा नेता अशा शब्दांत गौरव केला. महिलांची उपेक्षा कोणाच्या लक्षातही आली नव्हती ती पवार यांच्या आली व त्यांनी सन्मान देणारी कृतीही केली. ७५ वर्षे काय, त्यांनी आणखी २५ वर्षे देशासाठी काम करावे असे पाटील म्हणाल्या. महापौर मुक्ता टिळक यांनी, एखाद्या व्यक्तीची साठी, पंंंचाहत्तरी साजरी होती, मात्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीची पन्नाशी साजरी होत आहे ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असल्याचे सांगितले. माजी केंद्रीय कृषी सचिव राधा सिंग तसेच खासदार रजनी पटेल यांचेही या वेळी भाषण झाले.

पवार उवाच


१ मुलीला वडिलांच्या मालमत्तेत स्थान देण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षातून तर विरोध झालाच, शिवाय स्वपक्षातूनही झाला. जे विरोध करत होते त्यांना विचारले तुम्हाला मुले किती? त्यांनी सांगितले तीन. मग तीन सुना येतील त्यांच्या वडिलांची मालमत्ता तुमच्याकडे आली तर काय अडचण आहे, असे विचारल्यावर मात्र त्यांनी लगेच मंजुरी दिली.
२ सैन्यात मुलींना स्थान देण्याबाबत तिन्ही लष्करप्रमुखांचा विरोध होता. सलग तीन महिने यावर चर्चा सुरू होती. तीन महिन्यांनंतर त्यांना म्हटले, संरक्षणमंत्री म्हणून मला जनतेने निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे व मी तो घेतला आहे. त्यामुळे तुम्ही आता त्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे त्याच्या तयारीला लागा.
३ दिलेले काम सोडून दुसरीकडे लक्ष देणे ही पुरुषांची वृत्ती आहे, तर दिलेल्या कामाकडे बारकाईने लक्ष देऊन ते पूर्ण करणे ही महिलांची. दुधाकडे पाहा असे सांगितले तर पुरुष दुसरीकडे पाहतो व दूध ऊतू जाते, महिला मात्र फक्त दुधाकडेच पाहतात, कारण दूध ऊतू गेले तर काय नुकसान होणार आहे हे त्यांना माहिती असते.

Web Title: Women are not short in any field than men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.