स्मार्ट सिटीचे आरोग्य आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 03:06 AM2017-07-24T03:06:56+5:302017-07-24T03:06:56+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही शहर अग्रणी राहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही शहर अग्रणी राहिले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत दूषित हवा व पाण्यामुळे होणाऱ्या आजारांत प्रचंड वाढ झाली आहे. कावीळच्या रुग्णांमध्ये तिपटीने तर टायफाईडच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. श्वसनाच्या आजारांमध्येही मोठी वाढ झाली आहे, अशी धक्कादायक माहिती महापालिकेच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीचा विकास मोठ्या वेगाने झाला आहे. त्याचबरोबर मूलभूत प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेले नाहीत. महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. त्या वेळी पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, हा विषय तहकूब करण्यात आला. महापालिकेचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात आरोग्याबाबतच्या उपाययोजना कमी असल्याचे दिसून येत आहे.
औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरणामुळे शहरवाढीला चालना मिळत असल्याने शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहोचली आहे. उपलब्ध होणाऱ्या रोजगारामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात येत आहेत. उपलब्ध सुविधांचा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होत असल्याने पर्यावरणांवर आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. हवा, पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. याचा परिणाम संसर्गजन्य रोगांमुळे बाधीत होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाणही वाढत आहे. बदलत्या हवामानामुळे आजाराची संख्या वाढली आहे, असे पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल सांगतो.
औद्योगिक प्रदूषणावर
नाही नियंत्रण
औद्योगिक परिसरातील कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक औद्योगिक कंपन्यांना दूषित पाणी प्रक्रिया केंद्र बंधनकारक केले आहे. मात्र, बहुतांशी कंपन्या याकडे दुर्लक्ष करतात. हवेच्या प्रदूषण पातळीतही दरवर्षी वाढ होत आहे. लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढली आहे.
या वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरातून विषारी वायूंचे हवेतील प्रमाण वाढते. याशिवाय रस्ते, बांधकाम, उघड्यावरील कचरा यामुळे निर्माण होणारे धुलीकण आणि कंपन्यांमधून होणारे वायुप्रदूषण यामुळे श्वसनाशी संबंधित अनेक आजार होतात.
संसर्गजन्य आजार
महापालिका परिसरातील प्रदूषित पाण्याद्वारे गॅस्टो, कावीळ, टायफाईड, जठरांचा व आतड्यांचा दाह, विषमज्वर हे आजार होतात. प्रदूषित हवेद्वारे दमा, पुष्ठपुष्ठस्साचे असे श्वसनाचे विविध आजार होतात. गेल्या काही वर्षात स्वाइन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे.
डासांमुळे होणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार सध्या आटोक्यात असले तरी या रोगाचीही लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. गेल्या दोन वर्षांत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कावीळ, टायफाईड या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एड्स, श्वसनरोग, हृदयविकराचा झटका, मेंदूचे आजार, कुष्ठरोग या आजारांचे रुग्णही वाढले आहेत.