नाशिक फाटा उड्डाणपुलावर उडतोय गोंधळ
By admin | Published: February 13, 2015 05:03 AM2015-02-13T05:03:08+5:302015-02-13T05:03:08+5:30
कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
पिंपरी : कासारवाडी येथील भारतरत्न जे.आर.डी. टाटा दुमजली उड्डानपुलावरील दिशादर्शक फलक दिसत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. दिशाभूल होऊन वाहने चूकीच्या मार्गाने ये- जा करावी लागते. त्यामुळे अनेकांना दूर अंतरावरुन वळसा घालून ये-जा करण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषता नव्याने या मार्गावर आलेल्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे- मुंबई जुना महामार्ग आणि पुणे- नाशिक महामार्गाला छेद देणारा कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात हा दुमजली उड्डान पुल नव्यानेच उभारला आहे. शहरातील सर्वांत उंच आणि अधिक लांबीचा असे या पुलाचे वैशिष्टये आहे. कासारवाडीकडून भोसरीकडे जाणारा आणि रस्ता, नदी आणि लोहमार्गावरुन जाणारा भोसरी आणि पिंपळे गुरव असे दोन पुल आहेत.
ग्रेडसेपरेटरमधून दापोडीहून कासारवाडीत आल्यानंतर भोसरीकडे जाण्यासाठी पुल सुरू होतो. मात्र, तेथे लावलेला दिशादर्शक फलक खूपच छोटा आहे. वेगात असलेल्या वाहनांना तो दिसत नाही. त्यामुळे वाहने थेट पिंपरीकडे जातात. त्यामुळे त्याची फसगत होते. थेट पुलावर न गेल्याने चौकातील सिग्नलला थांबून वळण घेऊन भोसरीकडे जाण्याची वेळ येते.
पिंपळे गुरव-भोसरी पुलाकडे ये- जा करण्यासाठी कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूने उपरस्ता आहे. मात्र, जाणे आणि येण्याच्या माार्गवर दिशादर्शक फलक दर्शनी आणि मोठ्या आकारात नसल्याने कोठून वळण घ्यायचे हे समजत नाही. यामुळे चालक वाहन चुकीच्या मार्गाने पुढे जातो. वाहने विरुद्ध दिशेने वाहने जातात. यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. उपरस्त्याचे वळण अधिक वर्तुळाकार असल्याने टर्न घेताना धांदल उडते. उपरस्त्याचे कठडे अधिक उंच असल्याने पलीकडील वाहने दृष्टिस पडत नाही.
पिंपळे गुरवहून कासारवाडीत जाण्यासाठी उपरस्ता आहे. तो न समजल्याने भोसरी मार्गावरील वाहतूक पोलीस कक्षापर्यत जाऊन पुन्हा मागे वळून यावे लागते. त्यात सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा वळसा पडतो. या पुलावरुन पिंपरीकडे जाण्यासाठी अवजड वाहनांना वाहतूक पोलीस कक्षापर्यतच गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. तेथून वळसा घ्यावा लागतो.