गोजिरवाण्या घरात, मालिकांची वरात..!

By Admin | Published: July 30, 2014 12:28 AM2014-07-30T00:28:33+5:302014-07-30T00:51:10+5:30

लोकमत चमू, उस्मानाबाद धकाधकीच्या जीवनात दूरचित्रवाणी संचावरील मालिका पाहण्यासाठी महिला वेळ काढतातच !

In the house of gajirwana, the bosses ..! | गोजिरवाण्या घरात, मालिकांची वरात..!

गोजिरवाण्या घरात, मालिकांची वरात..!

लोकमत चमू, उस्मानाबाद
धकाधकीच्या जीवनात दूरचित्रवाणी संचावरील मालिका पाहण्यासाठी महिला वेळ काढतातच ! चोवीस तास विविध विषयावरील मालिकांसह चित्रपट, क्रीडा, बातम्या आदींचा जणू महापूर दूरचित्रवाणीवर आहे़ टीव्हीवर टीआरपी-जीआरपी मिळविण्यासाठी वाहिन्यांमध्ये तीव्र स्पर्धाही निर्माण झाली आहे़ टीआरपी-जीआरपी मिळविण्यासाठी प्राइम टाइम अर्थात सायंकाळी ७ ते ११.३० वाजेची वेळ महत्त्वाची मानली जाते. याच प्राइम टाइममध्ये अनेक मालिकांचा अक्षरश: रतीब घातला जातो. प्राइम टाइममधील मालिकांचा सर्वाधिक प्रेक्षक आहे तो महिलावर्ग. मालिकांचा महिलांवर असलेला पगडा लक्षात घेता एकूणच मालिकांबाबत गृहिणींची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एक प्रश्नावली त्यांच्यासमोर मांडली. या सर्वेक्षणांतर्गत महिलांची मते जाणून घेण्यात आली. त्यातून निघालेले निष्कर्ष व बोलक्या प्रतिक्रियांवर आधारित हा स्पेशल रिपोर्ट...
मालिकांच्या दर्जाबाबतही महिला जागरूक
प्राइम टाइममध्ये दाखविल्या जाणाऱ्या काही मालिकांच्या दर्जाविषयी गृहिणींनी नापसंती व्यक्त केली. सुरुवातीला कथानक चांगले वाटते नंतर त्यात जी काही घुसवाघुसवी केली जाते, त्याला गृहिणींनी आक्षेप नोंदविला आहे. मराठी वाहिन्यांवरील काही मालिका चांगल्या असल्या तरी इतर मालिकांचा दर्जाही खालावला आहे़ हिंदी वाहिन्यांवरील मालिकांबाबत हा प्रकार अधिक दिसून येतो़ काही मालिकांमध्ये कौटुंबिक वातावरणात दाखविला जाणारा खलनायकीपणाही गृहिणींना खटकतो. केवळ ग्लॅमर दाखविले जात असल्याचीही काहींची तक्रार आहे. काही मालिकांमध्ये कौटुंबिक भान हरपत चालले असून, युवा पिढीवर संस्कार घडणार कसे ? असा प्रश्न काहींनी व्यक्त केला़ तर अधिकतम मालिकांमध्ये तोच-तो विषय मात्र वेगळ्या पध्दतीने मांडण्यात येत असल्याने, अशा मालिका पाहण्यात रस राहत नसल्याचेही मत अनेक महिलांनी नोंदविले़ शिवाय मालिकांमध्ये नवीन चित्रपटाची जाहिरात करून दाखविण्यात येणारी प्रसिध्दीही अनेकांना खटकत आहे़ एकूणच मराठीसह हिंदी मालिकांचा दर्जा ढासळत असल्याचे मत काही गृहिणींनी परखडपणे व्यक्त केले.
श्री, जान्हवी-मेघनाच्या पात्राची महिलांना भुरळ
झी मराठीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’ या दोन मालिकांना गृहिणींची पसंती दिसून आली. जान्हवीचा समजूतदारपणा, श्रीचा प्रामाणिकपणा आणि मेघनाचा निरागस भाव जास्त भावत असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील ‘नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागले तू मला मी तुला’ ह्या गीताच्याही प्रेमात अनेक गृहिणी पडल्या आहेत. काही गृहिणींनी आपली मोबाइलची ट्यून म्हणून हे गीत करून घेतले असल्याचे सांगितले. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील आई-आजीच्या पात्रानेही अनेकांना भुरळ घातली आहे़ त्यांचा समजूतदारपणाही भावला आहे़ रेशीमगाठीमधील माई यांनी हाकलेला संसाराचा गाढाही प्रेरणादायी ठरत आहे़ ‘जावई विकत घेणे आहे’ मधील प्रांजलीचे बाबा हे पात्रही अनेक महिलांना आवडले आहे़ स्वच्छ व्यक्तिमत्त्व आणि सांभाळून घेण्याची वृत्ती अनेकांना भावली आहे़ ‘माझे मन तुझे झाले’ मधील शेखर व शुभ्रा ही पात्रेही कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात, त्यातून आजच्या पिढीला आदर्शवत प्रेरणा मिळत असल्याचेही अनेकांनी सांगितले़ एकूणच श्री, जान्हवी, मेघना यांच्यासह माई, प्रांजलीचे बाबा, शेखर आणि शुभ्रा या पात्रांनी महिलांना मोठी भुरळ घातली आहे़
‘महाभारता’ची सर्वांनाच गोडी
प्राइम टाइममध्ये गृहिणींनी हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांवरील मालिकांना आपली पसंती दर्शविली आहे. त्यात गृहिणींकडून सर्वाधिक पसंती लक्षात आली ती स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेला. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दाखविल्या जाणाऱ्या ‘महाभारत’ मालिकेची वेळ योग्य असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. सायंकाळचा हा एक तास मोकळा असल्याने ‘महाभारत’ मालिका पाहणे सोपे जाते. त्याच दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर आदेश भाऊजींचा ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम लागत असल्याने बऱ्याचदा रिमोटची ओढाताण होत असल्याची कबुलीही काही गृहिणींनी दिली. स्टार प्लसवरही हिंदीतून ‘महाभारत’ लागते. मराठीत डब केलेले महाभारत स्टार प्रवाहवर दाखविले जाते. १९८९-९० च्या सुमारास बी. आर. चोप्रा निर्मित ‘महाभारत’ मालिका दाखविली जायची. चोप्रांचे महाभारत पाहिलेल्या गृहिणींकडून आता स्वस्तिक प्रकाशनच्या महाभारताची तुलना केली जात असली, तरी नव्या पिढीतील गृहिणींमध्ये ‘महाभारत’ मालिकेने सर्वांत वरचे स्थान मिळविले असल्याचे सर्वेक्षणात लक्षात आले. बी. आर. चोप्रा, एकता कपूर आणि आता स्वस्तिक प्रकाशनचे महाभारत पाहणाऱ्या एका ज्येष्ठ गृहिणीने एक मजेशीर बदलही ऐकविला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चोप्रांच्या महाभारतातील गांधारीच्या डोळ्यावर पांढरी पट्टी होती. एकता कपूरच्या महाभारतात ती काळी झाली आणि आताच्या महाभारतात गांधारीची पट्टी लाल आहे. एकूणच महाभारताचे गारुड कायम असल्याचे लक्षात येते.
स्वयंपाक सुरु असतानाही हातात रिमोट..
प्राइम टाइम पूर्वी रात्री ९ वाजेपर्यंतचा असायचा. आता हिंदी व मराठी वाहिन्यांनी प्राइम टाइम पुढे सरकवत तो पार रात्री ११.३० वर नेला आहे. त्यामुळे आता सायंकाळी ७ ते रात्री ११.३० असा प्राइम टाइम बनला आहे. सायंकाळी कीचनरूममध्ये स्वयंपाकाची तयारी करता-करता गृहिणींच्या हातातील रिमोटची बटनेही दर अर्ध्या तासाला बदलत जातात. स्वयंपाकघरात आता स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तूंबरोबरच टीव्हीच्या रिमोटनेही जागा पटकावली आहे. सर्वेक्षणानुसार, गृहिंणींकडून स्वयंपाकाची तयारी करण्याची वेळ सायंकाळी ७.३० ते ८ वाजता नोंदवली गेली आहे. मोठे कुटुंब असेल तर त्याठिकाणी सायंकाळी ६ वाजेपासूनच तयारी सुरू होत असल्याचे लक्षात आले. नोकरदार महिलांकडून रात्री ९ वाजेनंतर तयारीला सुरुवात होत असल्याचे समजले. स्वयंपाकाची तयारी करता करता टीव्हीवरील हिंदी व मराठी मालिका बघणाऱ्या गृहिणींची संख्या सर्वाधिक आहे. घरात ज्येष्ठ मंडळी व मुले असतील तर त्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम अथवा मालिका बघाव्या लागत असल्याचा तक्रारीचा सूर श्रध्दा निकम, समीक्षा खडसे, यांनी व्यक्त केला़ तर प्राइम टाइमच्या रात्री उशिरापर्यंत सरकत जाणाऱ्या स्लॉटबाबत गीता अंबुरे, ज्योती चव्हाण यांनी नाराजी बोलून दाखविली.
वास्तवतेऐवजी कल्पनाविलासच जास्त
हिंदी-मराठी वाहिन्यांवर प्राइम टाइममध्ये काही मोजक्या मालिका सोडल्या तर बऱ्याच मालिका रटाळ असल्याचा सूर गृहिणींमधून ऐकायला मिळाला. प्रामुख्याने ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सावर रे’, ‘जावई विकत घेणे आहे’. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दुर्वा’, ‘देवयानी’, ‘मानसीचा चित्रकार तो’ यांसारख्या मालिका रटाळ असल्याचे मत गृहिणींनी व्यक्त केले. कथानकाला मध्येच वेगळे वळण देऊन प्रेक्षकांना झुलवत ठेवण्याच्या प्रकारालाही गृहिणींनी आक्षेप घेतला आहे. वास्तवतेऐवजी कल्पनाविलास जास्त आहे आणि वैचारिकता संपुष्टात आल्याची तक्रार गृहिणींनी केली. अशा रटाळ मालिकांऐवजी महिलांना स्वयंसिद्ध करणारे माहितीपर कार्यक्रम असावेत, चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रम दाखवावेत, अशी अपेक्षा कार्तिकी उडगे, स्वाती सोलंकर यांनी व्यक्त केली.
हिंदी-मराठी मालिकांना संमिश्र प्रतिसाद
सर्वेक्षणात गृहिणींचा हिंदी-मराठी मालिकांना संमिश्र प्रतिसाद असल्याचे लक्षात आले. प्रामुख्याने महाभारत, जोधा अकबर, दिया और बाती, ये मोहब्बते, गुस्ताख दिल, महाराणा प्रताप, जय मल्हार, झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची, जुळून येती रेशीमगाठी, होम मिनिस्टर, एका लग्नाची तिसरी गोष्ट, देवांचे देव महादेव, दुर्वा या मालिकांना गृहिणींची विशेष पसंती दिसून आली. काही मालिकांची वेळ एकाच वेळी आल्याने गोंधळ होत असल्याचा तक्रारवजा सूरही ऐकायला मिळाला, तर काही मालिकांचे पुन:प्रक्षेपण होत असल्याने मालिका पाहणे चुकत नसल्याचेही गृहिणींनी सांगितले.
अन्यायाला वाचा फुटावी
प्राईमटाईममध्ये कौटुंबिक मालिका दाखविण्यात येतात़ अशा मालिकांमधून विनोदी भूमिकांसह वाढत्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची, त्याला वाचा फोडण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, अशी पात्रे रंगवून मालिकांची निर्मिती होणे आवश्यक आहे़
-सुजाता शिंदे,
माणिक चौक, उस्मानाबाद
शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी
कौटुंबिक मालिका मोठ्या प्रमाणात आहेत़ मात्र, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रत्येक पालकासमोर आहे़ त्यामुळे पाल्यांचे शिक्षण आणि पालकांची, गुरूजनांची जबाबदारी व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, अशा मालिकांची आवश्यकता आहे़
-अनिता माने
उस्मानाबाद
वाईट गोष्टी बाजूला ठेवाव्यात
कौटुंबिक मालिकांमध्ये घरातील कलह आणि नंतर निर्माण होणारे स्नेह ही बाब चांगली आहे़ मराठी विशेषत: हिंदी मालिकांमध्ये घाणेरड्या बाबींसह गुन्हेगारी विषय वाढविण्यात येत आहेत़ याचा युवा पिढीवर विपरित परिणाम पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे हे विषय मालिकांमध्ये नसावेत़
-वीणा देसाई
माणिक चौक, उस्मानाबाद
प्राइम टाइममध्ये टीव्ही बंद असेल तर...?
प्राइम टाइममध्ये टीव्ही बंद असेल अथवा रिमोटचा घरातील अन्य कुणी ताबा घेतला असेल तर अस्वस्थता वाढते आणि घुसमट होत असल्याची भावना बव्हंशी गृहिणींनी बोलून दाखविली. त्यात काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाला अथवा भारनियमन असेल तर संतापात भर पडत असल्याचेही सांगण्यात आले. काही मालिकांचे भाग चुकले तरी पुन:प्रक्षेपण दाखविले जाते परंतु पुन:प्रक्षेपण पाहिले जाईलच असे नाही. पुन:प्रक्षेपणाची वेळ सोयीची नसल्याचेही गृहिणींचे म्हणणे आहे. ई टीव्हीवर ‘माझे मन तुझे झाले’ ही मालिका बघितली जाते परंतु तिची दुपारी २ वाजेची वेळ आहे आणि रात्री ८.३० वाजता पुन्हा दाखविली जाते. परंतु रात्री ८.३० वाजता त्याचवेळी झी मराठीवर ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका दाखविली जात असल्याने ‘माझे मन तुझे झाले’ ह्या मालिकेचा भाग पाहता येत नसल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे. तीच तक्रार ‘होम मिनिस्टर’बाबतही करण्यात आली आहे. सकाळच्या वेळी घरकामात गुंतल्याने सकाळचा भाग पाहता येत नसल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे.
अशी होती प्रश्नावली...
१) ‘प्राइम टाइम’मध्ये दाखविल्या जाणाऱ्या मालिका
आपण पाहतात काय?
२)कोणत्या मालिका पाहतात आणि कोणत्या मालिका जास्त आवडतात?
३)आवडणाऱ्या मालिकेतील कोणती पात्रे जास्त भावली आणि का?
४)मालिकांचा दर्जा ढासळत चालला आहे काय?
५)मालिकांचे विषय कसे असावेत?
६)पुढे सरकत चाललेला प्राइम टाइमचा कालावधी योग्य वाटतो का?
७)मालिकांमधील चुकीच्या गोष्टींवर आपण कसे व्यक्त होता?
८)प्राइम टाइममध्ये टीव्ही बंद असेल तर अवस्था कशी होते?
९)मालिकांमधील सवंगपणाबद्दल प्रतिक्रिया काय?
१०)फावल्या वेळेत पुस्तके वाचतात काय?

Web Title: In the house of gajirwana, the bosses ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.