६२ बालकांची हृदय शस्त्रक्रिया
By Admin | Published: June 28, 2017 12:02 AM2017-06-28T00:02:25+5:302017-06-28T00:03:12+5:30
हिंगोली : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील २ लाख १८ हजार ४१४ बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील २ लाख १८ हजार ४१४ बालकांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत असून ६२ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी ५८ तर अंगणवाडीतील ४ बालकांचा सामावेश आहे.
निरोगी व सुदृढ पिढी घडविण्यासाठी जिल्हाभरात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी तसेच शालेय मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांची मोफत तपासणी व उपचार केले जात आहेत. आरोग्य तपासणी करून बालकांत आढळून आलेल्या आजारांवर वेळीच उपचार करण्यात आले. ६ ते १८ या वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी व त्यांच्या आजारांवर मोफत उपचार या कार्यक्रमातून केले जातात. सदर कार्यक्रमात २०१६-१७ मध्ये जिल्ह्याला ६ ते १८ वयोगटातील २ लाख ३० हजार ९०० मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ लाख १८ हजार ४१४ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यामध्ये ५८ जणांना हृदयाचा विकार असल्याचे आढळून आले होते. त्यांची राजीवगांधी जीवनदायी योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. तर २३८ बालकांची इतर शस्त्रक्रिया या कार्यक्रमातून करण्यात आली. तसेच अंगणवाडीतील ० ते ३ वयोगटातील १ लाख ६६ हजार ३५ चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ बालकांची हृदय शस्त्रक्रया तर ३४ बालकांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयातर्फे देण्यात आली .