औरंगाबाद-पुणे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम घेतले काढून
By Admin | Published: July 13, 2017 12:58 AM2017-07-13T00:58:19+5:302017-07-13T01:04:59+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेतून पुण्याला जाताना अहमदनगर येथे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी मराठवाडा विभागाकडे असलेली जबाबदारी दिल्ली मुख्यालयाने काढून घेतली आहे. ७५० कोटी रुपयांचे हे काम नाशिक विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे येथील विभागावर मोठी नामुष्की ओढवली आहे. अहमदनगरच्या लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
पाच ते सहा तासांचा अवधी नवीन उड्डाणपुलामुळे अर्ध्या तासाने घटणार आहे. नगर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दीड किलोमीटरचा रोड तयार करण्यासाठी डीपीआर करण्याची जबाबदारी स्थानिक एनएचएआयकडे देण्यात आली होती. हे काम पुणे विभागाकडे गेल्यामुळे येथील यंत्रणेवर अविश्वास दाखविल्याचा प्रकार घडला आहे.
त्या पुलामुळे औरंगाबादमार्गे नगर ते पुण्याकडे जाणारी वाहने थेट शहराबाहेर जातील. नगरमधून सक्कर चौक ते चांदणी चौकादरम्यान सुमारे दीड किलोमीटरचा हा उड्डाणपूल असेल. या मॅकेनाईज्ड रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. वाहतूक थेट नगरबाहेर जाणार असल्याने औरंगाबाद-पुणे प्रवासाला लागणारा पाच ते सहा तासांचा अवधी अर्ध्या ते एक तासाने कमी होण्याचा अंदाज आहे. या मार्गाच्या डीपीआरसाठी एनएचएआयने तयारी सुरू केलेली असताना ते काम नाशिक विभागाकडे वर्ग झाले आहे.