प्रभावी उपचारपध्दतीने कॅन्सर होईल कॅन्सल : परिसंवाद
By admin | Published: April 24, 2017 09:36 PM2017-04-24T21:36:51+5:302017-04-24T21:50:40+5:30
‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादात उमटला.
नाशिक : कर्करोग जरी गंभीर आजार असला तरी त्यावर प्रगत वैद्यकशास्त्राने प्रभावी उपचारपध्दती शोधली आहे. योग्यवेळी योग्य निदान आणि चाचण्या रुग्णाने करून घेतल्यास कर्करोग निश्चितपणे बरा होऊ शकतो, असा सूर ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादात उमटला.
‘कॅन्सरला करा कॅन्सल’ हे ब्रीद घेऊन ‘लोकमत आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. याअंतर्गत नाशिकमध्ये आयोजित परिसंवादात मुंबई येथील कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे सर्जिकल अॅन्कोलॉजिस्ट व रोबोटिक सर्जन डॉ. मंदार देशपांडे, डॉ. समीर तुळपुळे यांनी कर्करोगाची लक्षणे, निदान व उपचारपध्दतीबाबत माहिती देतानाच रुग्णांनी भयग्रस्त न होता पुर्वलक्षणे लक्षात घेऊन आवश्यक त्या चाचण्या वेळोवेळी करून घ्याव्या, असा सल्ला दिला. कर्करोगाशी लढा देऊन पुर्णपणे सावरलेल्या मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड क्विन होण्याचा बहुमान मिळविलेल्या नमिता कोहक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनीही या परिसंवादात सहभाग घेतला. परिसंवादाचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर संकलेचा यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल उपस्थित होते.
याप्रसंगी विविध वैद्यकिय संघटनांचे पदाधिकारी डॉ. विकास गोऱ्हे, डॉ, संगीता बाफणा, डॉ. हेमंत सोननीस, डॉ. राजेश वळवी, डॉ. अमित पाटोळे, डॉ. अद्वैत अहेर, डॉ.नितीन रावते, डॉ. मृणालिनी किर्लोस्कर, डॉ. राजेश वसावे, डॉ. राजेश पाटील आदिंचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रारंभी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांनी प्रास्ताविक केले व निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.