आंबेडकरवादी लेखक कृष्णा किरवलेंची हत्या
By admin | Published: March 4, 2017 06:13 AM2017-03-04T06:13:56+5:302017-03-04T06:13:56+5:30
कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली
कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली. फर्निचरच्या कामाचे २५ हजार रुपये वेळेत न दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी प्रीतम गणपती पाटील (३०) यास अटक केली आहे. त्याच्या आई-वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
किरवले यांच्या हत्येमुळे दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हा खून दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून त्यामागे हिंदुत्ववाद्यांचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना घेरावही घातला; परंतु हत्येचे कारण व संशयित आरोपीस अटक केल्याचे समजल्यावर हे कार्यकर्ते शांत झाले. आरोपीचा मित्र विजयसिंह मोहनसिंह राजपूत (३४) याच्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते येथे १६ वर्षांपूर्वी आले व या शहराच्या सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनून गेले. येथील निवासस्थानी ते पत्नी कल्पना यांच्यासमवेत राहत होते. त्या दुपारी घरीच होत्या. त्यावेळी संशयित प्रीतम पाटील हा पैसे मागण्यासाठी घरी आला. दुसऱ्या मजल्यावर त्याने किरवले यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धारदार शस्त्राने किरवले यांच्या डोक्यात वार झाल्यावर ते जोराने ओरडले म्हणून त्यांची पत्नी वर गेल्यावर त्यांनी किरवले यांना रक्ताने माखलेल्या शरीरासह आरोपीने हाताने दाबून धरल्याचे पाहिले. ते पाहून भीतीने त्या ओरडतच बाहेर धावत आल्या. तोपर्यंत आरोपीने दरवाजा बंद करून घेतला. पत्नीने नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. आजूबाजूचे लोक धावून गेले; परंतु तोपर्यंत किरवले यांच्या गळ््यावर वार केले होते. प्रीतम पाटीलने मित्र विजयसिंहला फोन करून आपण खून केल्याचे व लोक जमले आहेत तर तू लवकर ये, असे सांगितले. त्यानंतर तो पसार झाला. डॉ. किरवले यांच्यावर हल्ला झाल्यानंतरही ते जिवाच्या आकांताने पळत दुसऱ्या मजल्यावरून खाली आले. त्यामुळे जिना व घरही रक्ताने माखले होते. शेवटी रक्तस्राव जास्त झाल्यावर ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
>दलित चळवळीचे भाष्यकार...
डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८० ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ ला त्यांनी ‘दलित शाहिर व त्यांची शाहिरी’ या विषयावर पीएच. डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२ ला ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे प्रमुख तसेच विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबूराव बागुल अशी त्यांची कांही पुस्तके प्रसिध्द आहेत. जळगांवला २०१२ ला झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे. या चळवळीचा भाष्यकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
मित्राच्या मुलानेच केला घात..
डॉ. किरवले यांचे व संशयित आरोपी प्रीतम याचे वडील गणपती पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेजारीच राहात होते. त्यामुळे ओळखीतून त्यांनी गणपती पाटलांकडून फर्निचरचे काम करुन घेतले होते. त्याचे पैसे द्या, असा तगादा प्रीतमने गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता.
पैसे देऊन टाका...
खून झाल्यानंतर नातेवाइकांनी पत्नी कल्पना यांना शेजारच्या घरातून हाताला धरून आणले. त्यावेळी त्या ‘पैसे देऊन टाका... आपणाला हे घर नको. येथून दुसरीकडे राहायला जाऊ असे मी त्यांना सांगत होते; पण त्यांनी ऐकले नाही.’ असे मोठमोठ्याने म्हणत होत्या. त्यानंतर त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. खाली कार्यकर्ते घोषणा देताना पाहून त्यांनीही खिडकीत येऊन ‘डॉ. आंबेडकर यांचा विजय असो..’ अशा घोषणा दिल्या.
>साहित्यात मोठा वाटा
दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत डॉ. किरवले यांचा मोलाचा वाटा राहिला. दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबूराव बागुल अशी त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत.