अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाव मोहीमेस ‘भूमाता’चा पाठींबा : तृप्ती देसाई
By admin | Published: June 20, 2017 06:10 PM2017-06-20T18:10:26+5:302017-06-20T18:10:26+5:30
माझ्या गणवेशाला विरोध करणाऱ्यांनी देवीस घागरा चोली घालणे निषेधार्ह
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : येथील अंबाबाई मंदीरात पुजाऱ्यांच्या मनमानीला विरोध करत पुजारी हटाव मोहीमेला भूमाता ब्रिगेडचा पाठींबा असल्याचे प्रतिपादन तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
देसाई मंगळवारी दुपारी कोकण दौऱ्यावर जाताना त्या कोल्हापूरात काही वेळ थांबल्या. कोल्हापूर महापालिकेत रस्ते हस्तांतराच्या नावाखाली दारु व्यवसायिकांना पाटबळ देणारा ठराव मंजूर करण्यात येत होता. त्या पार्श्वभूमीवर त्या ठरावाला विरोध दाखविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
देसाई म्हणाल्या, अंबाबाई मंदीरात महिलांना गाभारा प्रवेशावेळी आम्ही परिधान केलेल्या चुडीदार गणवेशाला या पुजाऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यावेळी भाडोत्री गुंडाकरवी या पुजाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली. महिलांनी मंदीरात प्रवेशताना कोणता ड्रेस कोड वापरावा हे ठरविणारे हे पुजारी कोण? असा प्रश्न करत देसाई म्हणाल्या, चुडीदारच्या नावाखाली माझ्यावर हल्ला करणाऱ्या या पुजाऱ्यांनीच आता अंबाबाई देवीला साडीऐवजी घागरा-चोली गणवेश घातला. ही पुजाऱ्यांनी मनमानी मोडीत काढली पाहिजे. त्यामुळे या मंदीरातील पुजारी हटाव मोहीमेला भूमाता ब्रिगेडचा पूर्णतहा पाठींबा आहे, तसेच या आंदोलनात भूमाता उतरेल असेही वक्तव्य तृप्ती देसाई यांनी यावेळी केले.