संगीतसूर्यांची स्मृती जपणारा रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर
By Admin | Published: August 12, 2015 12:44 AM2015-08-12T00:44:09+5:302015-08-12T00:45:16+5:30
भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली.
कोल्हापूर : संगीत रंगभूमीवर नव्या युगाचा प्रारंभ करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श संस्थेचा वारसा ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांनी जपला. त्यांच्यामुळे केशवरावांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचे कार्य घडले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले.
सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच सादर केली; पण त्यात नावीन्य आणि नवी नाटके रंगमंचावर आणत ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर, आदी नाटके गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांनी गाईलेली ‘आई तुझी आठवण येते’ आणि ‘तू जपून टाक पाऊल जरा’ ही गाणी अजरामर झाली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी भारतयात्रा काढली आणि महाराष्ट्राबाहेरील रसिकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले.
भालचंद्र पेंढारकर यांनी केशवराव भोसले यांची ललितकलादर्श संस्था नेटाने चालविली. गायन आणि अभिनयात अत्यंत पारंगत असल्याने त्यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला. नवी पिढी यात यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे. - सुधीर पोटे (गायक)
खडतर परिस्थितीत संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा पाया रचण्यात भालचंद्र पेंढारकर यांचे योगदान होते. सांस्कृतिक चळवळ सुरू करणे आणि ती नेटाने चालविण्याचे आव्हान पेंढारकर यांनी पेलल्याने ही समृद्धता अनुभवता आली. - भारती वैशंपायन (गायिका)