कुस बुद्रुकमध्ये आढळल्या प्राचीन गद्धेगाळ
By admin | Published: September 29, 2015 09:58 PM2015-09-29T21:58:02+5:302015-09-30T00:10:43+5:30
ग्रामस्थांची गर्दी : शिल्पांची ठेवण अन् रचनेवरून त्या बाराव्या शतकातील असण्याची शक्यता
परळी : सातारा तालुक्यातील कुस बुद्रुक येथील कालभैरवनाथ मंदिराच्या समोरील दीपमाळेच्या चौथऱ्यावर प्राचीन शिलालेख आढळला आहे. यावर मध्यभागी हळेकन्नडमध्ये लिहिलेले काही पुसटसे शब्द दिसतात. त्याचे वाचन करता येत नसले तरी शिल्पाची ठेवण व रचना पाहता त्या बाराव्या शकतातील असू शकतात, अशी माहिती इतिहास संशोधक आदित्य फडके यांनी ‘लोकमत’ला दिली. कुस बुद्रुकला प्राचीन इतिहास आहे, यावर या शिलालेखाने शिक्कामोर्तब केले आहे. प्रसिद्ध कालभैरवनाथ मंदिराच्या समोरील दीपमाळेच्या चौथऱ्यावरील गद्धेगाळच्या वरच्या बाजूस तीर्थंकराच्या डाव्या-उजव्या बाजूला सूर्य व चंद्रकोर दिसते. खालच्या बाजूला दोन स्त्रियांशी गाढव रत होताना दाखविले आहे. या प्रकारची दोन स्त्रिया असलेली गद्धेगाळ फार कमी ठिकाणी आढळलेली आहे. सामान्यत: अशा गद्धेगाळवर एकच स्त्री आणि एकच गाढव असते; पण येथे दोन स्त्रिया म्हणजे माता व पत्नी या दोन्हीही अभिप्रेत आहेत, असे दिसते. त्यामुळेच ही शिळा खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
दुसरी शिळा खडगावजवळ रस्त्याजवळ पडलेली आहे. त्यावर केवळ गाढव कोरलेले आहे. कोणत्याही स्त्रीचे शिल्प त्यावर नाही. पण त्यावरील रकान्यात सूर्य व अर्धचंद्र पाहायला मिळतो. त्यालाही गद्धेगाळ नावानेच ओळखतात; पण फक्त गाढवाची प्रतिकृती कोरुन काय सुचवायचे होते हे पाहावे लागणार आहे. ‘तू गाढव आहेस,’ असा वाक्यप्रयोग सामान्यत: आजही वापरला जातो. तसाच अर्थ येथेही अभिप्रेत आहे का, हे तपासून पाहावे लागणार आहे.
‘जो कोणी प्रस्तुत दान दिलेली जमीन लुबाडण्याचा प्रयत्न करेल, तो गाढव आहे,’ हे यावरुन सांगायचे असेल; पण हे केवळ लिहून ठेवल्यास समजणार नाही. त्यामुळे गाढव कोरलेले आहे. हे गाढव एखाद्या बोकड किंवा त्या प्रकारच्या प्राण्यासारखे कोरलेले आहे. याच्या खालच्या बाजूला कोणताच मजकूर नाही, असेही फडके यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
शापवाणीला रामायण काळापासून संदर्भ
पुराणातही गाढव म्हणजेच गर्दभाचे उल्लेख सापडतो. वाल्मिकी रामायणामध्ये रावणाच्या रथाला गाढव वाहन असल्याचे म्हटले आहे. कारण ‘उन्मत्ताच्या रथाला अविवेकाने गती द्यावी, हे अगदी स्वाभाविक आहे.’ तसेच अश्विनीकुमार आणि शीतला यांचे वाहनही गाढवच आहे. यमाची पत्नी निर्ॠती हिला ब्रह्महत्येचे पातक झालेल्याने पूर्वी गाढवाचा बळी द्यावा, असे पुराणामध्ये म्हटलेले आढळते. जेष्ठा, निर्ॠती आणि शीतला या सगळ्या अशुभ देवता मानल्या जातात. त्यांचा संबंध निष्फळ स्त्रियांशीही जोडला गेला आहे आणि नेमून ठेवलेले शासन मोडण्याचा प्रयत्न करेल, त्याच्या पोटी ‘अवदसा’ जन्माला आली, असे मानून त्याला शासन भोगावेच लागेल, या अर्थाने शामवाणीत उल्लेखिला गेला आहे.
गद्धेगाळ ही शापवचने असलेली शिळा असते. यावर ज्यांनी दान दिले आहे आणि ज्यास दिले आहे, त्यांची नावे, तिथी/मिती, जागेचा तपशील आणि शिवी-शाप अर्थाने मजकूर दिलेला असतो. गद्धेगाळप्रमाणेच ‘घोडेगाळ’ नावाचाही एक प्रकार आहे. त्यामध्ये गाढवाऐवजी घोडा असतो. त्यामुळे काही शापवचनामध्ये गाढव आणि घोडा या दोन्हीचाही समावेश होतो.
- आदित्य फडके