लॉबिंग, सह्यांचा उद्योग चालणार नाही...
By admin | Published: January 22, 2016 12:17 AM2016-01-22T00:17:37+5:302016-01-22T00:50:53+5:30
पतंगराव कदम : मिरजेत नगरसेवकांची बैठक; मते अजमावूनच महापौर पदाचा फैसला होणार
मिरज : महापौैर निवडणुकीसाठी लॉबिंग, सह्यांच्या मोहिमेचा उद्योग करू नका. सर्व नगरसेवकांचे मत अजमावूनच निर्णय होईल. ज्यांना पद मिळाले नाही, त्यांना न्याय देऊ, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले.
महापौर निवडणुकीच्या काँग्रेस पक्षातील गटबाजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मिरजेत गुरुवारी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी पतंगराव कदम बोलत होते. ते पुढे म्हणाले, महापालिका निवडणूक एकदिलाने लढल्याने काँग्रेस पक्षाला यश मिळाले. महापालिकेत काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. महापौर निवडणुकीसाठी लॉबिंग, नगरसेवकांच्या सह्या अशा उद्योगाचा काहीच उपयोग होणार नाही. सर्व नगरसेवकांचे मत अजमावूनच महापौर पदाचा निर्णय होईल. बंद पाकिटातून महापौर पदासाठी निवड झालेल्याचे नाव येईल. सर्वांना न्याय मिळेल, मात्र पक्ष टिकला पाहिजे. ज्यांना काही मिळाले नाही, त्यांना न्याय मिळेल. मदनभाऊ जाताना काही सांगून गेले, जयश्री पाटील योग्यवेळी ते जाहीर करतील. कांचन कांबळे यांनी महापौर पदाचा राजीनामा देऊन शिस्त पाळली. त्याप्रमाणेच सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत गोंधळ झाल्याने पक्षाचे नुकसान झाले. काँग्रेस पक्षात दोन गट झाल्याने सरकार गेले. त्यामुळे पक्ष टिकला पाहिजे, याचे सर्वांनी भान ठेवावे. यावर आत्मचिंतन करा, असा सल्लाही पतंगराव कदम यांनी दिला.
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, महापालिकेत सत्ता परत मिळविण्यासाठी मोठी आश्वासने दिल्याने, नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. राज्यात व केंद्रात सत्ता नसल्याने काळ अडचणीचा आहे, याचे भान ठेवा. जिल्हाधिकारी किती चांगले काम करतात, याची चर्चा होते. मात्र महापौरांनी किती चांगले काम केले, याची चर्चा होत नाही. ज्या नेत्यांनी उमेदवारी मिळवून दिली, प्रचार केला, त्यांना प्रभागातील कार्यक्रमाला बोलाविण्यात येत नाही. कामे होत असताना किंवा निधी मिळत नसेल, तर त्याचीही चर्चा होणे आवश्यक आहे. या पातळीवर विस्कळीतपणा दिसतो. महापौर पदाबाबत जयश्रीताई जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत सर्वजण असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, मदन पाटील यांच्यावर सर्वांचे प्रेम व निष्ठा असल्याने मी नेतृत्व करीत आहे. काँग्रेस सदस्य यापुढेही काँग्रेसमागे एकसंध उभे राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गटनेते किशोर जामदार, माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनीही, काँग्रेस नेते घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल असे सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. महापौर विवेक कांबळे, स्थायी सभापती संतोष पाटील, सुरेश आवटी, हारूण शिकलगार, संजय मेंढे उपस्थित होते. (वार्ताहर)
पक्ष एकसंध : जयंतरावांवर अप्रत्यक्ष टीका
पक्षातील गटबाजीमुळे राज्यात काँग्रेसचे सरकार गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता काँग्रेसचे पुन्हा जबरदस्त वातावरण निर्माण झाल्याचे पतंगराव कदम यांनी सांगितले. जयंत पाटील यांचे नाव न घेता, आमचा दुसरा भिडू एकदम भारी आहे. खांद्यावर हात टाकून भ्रम निर्माण करतो. मात्र काँग्रेस नगरसेवक एकसंध असल्याची ग्वाही कदम यांनी दिली. पद नशिबात असेल तर मिळते. काँग्रेसमध्ये तर वरूनच नाव येते. मी तीन वेळा मुख्यमंत्री होता-होता राहिलो, असे कदम यांनी मिश्किलपणे सांगितले. ताकारी, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी पैसे भरा, अशी रोजच सुरू आहे. आमचे सरकार असताना आम्ही टंचाई निधीतून पैसे दिले होते. त्यासाठी सरकार आमच्या हातात पाहिजे, असेही कदम यांनी सांगितले.
कारभार चांगला नाही!
माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी मात्र, महापालिकेचा कारभार समाधानकारक नसल्याची टीका केली. प्रभागातील कामे झाले नाहीत तर कोणत्या तोंडाने निवडणुकीत लोकांपुढे जाणार? असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभागात विनानिविदा कामे होतात. मात्र काँग्रेस नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. मी तुमच्यात असल्याने काँग्रेसची सत्ता आली. मात्र तरीही संशयास्पद वातावरण निर्माण केले येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पैसे देऊन सह्यांची मोहीम...
शिवाजी दुर्वे यांनी, महापौर पदासाठी काही इच्छुकांकडून नगरसेवकांना पैसे देऊन सह्यांची मोहीम सुरू आहे. त्यास प्रतिबंध करण्याची मागणी बैठकीत केली. सह्यांच्या मोहिमेचा उपयोग होणार नसल्याचे कदम यांनी सांगितले.