दोन ‘जलदूत’ आज लातूरला धावणार

By admin | Published: April 18, 2016 11:58 PM2016-04-18T23:58:49+5:302016-04-19T00:57:53+5:30

जलवाहिनीचे काम पूर्ण : आठवी पाणी एक्स्प्रेस लातूरला रवाना

Two 'Jaladas' will run today in Latur | दोन ‘जलदूत’ आज लातूरला धावणार

दोन ‘जलदूत’ आज लातूरला धावणार

Next

मिरज : मिरजेतून सोमवारी सायंकाळी दहा टॅँकरची आठवी ‘जलदूत’ एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली. लातूरला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस साडेसतरा लाख लिटर पाणी घेऊन लातूरकडे धावणार आहेत. दरम्यान, लातूरसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली.
मिरजेतून दहा टॅँकरची आठवी जल एक्स्प्रेस सायंकाळी ५.४० वाजता रवाना झाली. आतापर्यंत लातूरकरांसाठी ४० लाख लिटर पाणी जल एक्स्प्रेसने पोहोचविले आहे. सोमवारी दुपारी आणखी दहा टॅँकरमध्ये पाणी भरण्यास सुरुवात करण्यात आली. ही जल एक्स्प्रेस मंगळवारी रवाना होणार आहे. मिरजेतील जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याचा थेट हैदरखान विहिरीत साठा करण्यात येणार असल्याने विहिरीतील पाणी ३५ अश्वशक्ती पंपाद्वारे उपसा करण्यात आले. सोमवारी रात्री थेट नदीतून उपसा केलेले पाणी हैदरखान विहिरीत सोडून २५ अश्वशक्ती पंपाद्वारे २५ टॅँकरमध्ये वितरिकेने भरण्याचे काम सुरू झाले. मंगळवारी दहा व पंचवीस टॅँकरच्या दोन जल एक्स्प्रेस अंदाजे १७ लाख ५०० लिटर पाणी घेऊन लातूरला पाणी पुरवठ्यासाठी धावणार आहेत. (वार्ताहर)


हैदरखान विहिरीत पाण्याचे झरे!
नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी हैदरखान विहिरीतील पाण्याचा उपसा करून तो ओढ्यात सोडण्यात येणार आहे. संपूर्ण पाण्याचा उपसा झाल्यानंतर विहिरीच्या चोहोबाजूंच्या झऱ्यातून पाणी वाहत होते. विहिरीतील शिल्लक पाण्याच्या नमुन्याचीही तपासणी केल्यानंतर नदीचे पाणी विहिरीत सोडण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
लातूरला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी नदीतून पाणी उपशासाठी पूर्ण करण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता एस. एल. गरंडे, महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे, तहसीलदार किशोर घाडगे, ठेकेदार शशांक जाधव, रेल्वे अधिकारी जॉर्ज उपस्थित होते. लातूरसाठी आतापर्यंत रेल्वेच्या
८ खेपांद्वारे ४० लाख लिटर पाणी देण्यात आले आहे. २५ टॅँकरद्वारे लातूरला पाणी देण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Two 'Jaladas' will run today in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.