कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र
By admin | Published: July 4, 2017 11:32 PM2017-07-04T23:32:56+5:302017-07-04T23:32:56+5:30
कर्जमाफीस २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्जमाफीच्या निर्णयाअंतर्गत टाकलेल्या नव्या नियमांच्या गुगलीने जिल्ह्यातील २६ हजार ७२७ शेतकऱ्यांना बाद ठरविले आहे. प्राथमिक टप्प्यात आता केवळ १५ हजार ६०६ शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असून, अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेक शेतकरी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत.
शासनाने, २०१२ पूर्वी कर्ज घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जदारांना कर्जमाफी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नियमाच्या आधारे आता २६ हजार ७२७ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याचा उल्लेख करून शासनाच्या नियमांची खिल्ली उडविली होती. वास्तविक जिल्हा बँकेनेही याबाबतचा अहवाल शासनाला दिला आहे. दीड लाखाची कर्जमाफी मिळणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण यादी ४२ हजार ३३३ शेतकऱ्यांची होती. यातील किमान ९० टक्के शेतकरी तरी नियमात बसतील, असे वाटत असतानाच, २०१२ च्या नियमाने ही यादी १५ हजाराच्या घरात आणली आहे.
पंचवीस हजारापर्यंतच्या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी १ लाख ६८ हजार ४८२ इतकी आहे. त्याची रक्कम ४२१ कोटी २० लाख ५० हजार इतकी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफीने फारसे काही पडणार नाही, असे चित्र आहे. २०१२ च्या नियमातून सुटलेले आणि कर्जमाफीस पात्र असलेले १५ हजार ६०६ शेतकरीही पूर्णत: कर्जमाफीस पात्र ठरले नाहीत. अन्य नियमांच्या आधारेही यातील अनेकजण अपात्रही ठरू शकतात. त्यामुळे ही संख्या आणखी कमी होऊ शकते. २०१२ पूर्वीच्या कर्जदारांना वगळण्याचा हा निर्णय शासनाने तातडीने रद्द करण्याची मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
सात-बारा कोरा होणार कसा?
सात-बारा कोरा होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या केवळ २३ हजाराच्या घरात आहे. याशिवाय दीड लाखावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम भरल्यानंतरच माफी मिळणार आहे. दुष्काळी भागातील अनेक शेतकरी दीड लाखावरील यादीत असल्यामुळे, त्यांना ही रक्कम भरणे अडचणीचे ठरणार आहे. एकूण ३०९५ शेतकऱ्यांचे ९६ कोटी ७२ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे.