विराटचे शतक वाया, ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० विजयी आघाडी

By admin | Published: January 17, 2016 09:17 AM2016-01-17T09:17:03+5:302016-01-17T16:44:42+5:30

ऑस्ट्रेलियाने मेलबर्न वनडे जिंकून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Virat Kohli's century, 3-0 lead in Australia series | विराटचे शतक वाया, ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० विजयी आघाडी

विराटचे शतक वाया, ऑस्ट्रेलियाची मालिकेत ३-० विजयी आघाडी

Next

ऑनलाइन लोकमत 

मेलर्बन, दि. १७ - ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट राखून मेलबर्न वनडे जिंकून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ४९ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने भारताने दिलेले २९६ धावांचे लक्ष्य पार केले. 
२१५ धावात ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाची आशा वाटत होती. मात्र मॅक्सवेलने सातव्या विकेटसाठी फॉकनरसोबत ८० धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाचा विजयाचा मार्ग सुकर केला. 
ऑस्ट्रेलियाला भारताच्या धावसंख्येशी बरोबरी करुन दिल्यानंतर उमेश यादवला मोठा फटका खेळण्याच्या नादात मॅक्सवेल बाद झाला मात्र तो पर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजय सुनिश्चित झाला होता. सलामीला आलेल्या शॉन मार्शने ६२ धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाच्या विजयाची पायाभरणी केली. त्याने कर्णधार स्मिथसह दुस-या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. 
कमकुवत गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या दोन सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावा करुनही विजय मिळाला नव्हता, तीच गत आजच्या सामन्यात झाली. भारतीय गोलंदाज आजही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सहजतेने फटके खेळण्यापासून रोखू शकले नाहीत. रविंद्र जाडेजा, इशांत शर्मा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर भारताने मेलबर्न वनडेमध्ये ५० षटकात सहा बाद २९५ धावा करुन ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विराटने ११७ चेंडूत ११७ धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. विराटने मेलबर्नवर कारकिर्दीतील २४ वे शतक झळकवले. 
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारतासाठी आजचा सामना करो या मरो होता. यापूर्वी दोन सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देऊनही भारताला ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता आले नव्हते. 
विराटला शतकी खेळीत शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेने तोलामोलाची साथ दिली. दुस-या विकेटसाठी विराट - शिखरने ११९ आणि त्यानंतर अजिंक्य-विराटने १०१ धावांची भागीदारी केली. शिखर धवन ६८ धावांवर बाद झाला. त्याला हेस्टिंग्सने बोल्ड केले. रहाणेने अर्धशतक झळकवल्यानंतर ५० धावांवर हेस्टिंग्सच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलकडे झेल दिला. 
विराटला हेस्टिंग्सनेच ११७ धावांवर बेलीकरवी झेलबाद केले. कर्णधार धोनीने हाणामारीच्या षटकात ९ चेंडूत २३ धावा फटकावल्या. त्याला हेस्टिंग्सनेच मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. हेस्टिंग्स ४ विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. रिचर्डसन आणि फॉकनरने प्रत्येकी एक विकेट घेतला. 

Web Title: Virat Kohli's century, 3-0 lead in Australia series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.