केंद्रीय मंत्री दत्तात्रेय गोत्यात

By admin | Published: January 19, 2016 04:18 AM2016-01-19T04:18:18+5:302016-01-19T04:18:18+5:30

दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने रविवारी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल सायबराबाद पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याने केंद्रीय

Union minister Dattatreya Goetta | केंद्रीय मंत्री दत्तात्रेय गोत्यात

केंद्रीय मंत्री दत्तात्रेय गोत्यात

Next

हैदराबाद/ नवी दिल्ली : दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने रविवारी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल सायबराबाद पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याने केंद्रीय श्रम राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काँग्रेसने त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणी केली. हैदराबाद येथील या घटनेचे पडसाद दिल्लीतही उमटले व दलित विद्यार्थी संघटनांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. मंत्री दत्तात्रेय यांच्याखेरीज विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव पोडिले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दोन कार्यकर्त्यांवरही आत्महत्येस प्रवृत्त करणे व दलितावर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या विद्यापीठातून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आलेल्या ५ विद्यार्थ्यांमध्ये रोहितचा समावेश होता.
रोहितच्या आत्महत्येनंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दोषींवर कारवाई केल्याखेरीज रोहितचा मृतदेह हलवू देणार नाही असा पवित्रा घेत विद्यार्थी संघटनेने रात्रभर धरणे दिले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी बळाचा वापर केला. विद्यार्थ्यांनी वसतिगृहाजवळ आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सवर दगडफेक केल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. गुंटूरचा रहिवासी असलेला रोहित हा विज्ञान-तंत्रज्ञान व समाज या विषयात पीएच.डी. करीत होता. आॅगस्ट २०१५ मध्ये विद्यापीठात ‘मुझफ्फरनगर बाकी है’ या वृत्तचित्र प्रदर्शनावरून दलित विद्यार्थी संघटना आणि अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या गटांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रोहित आणि अन्य पाच दलित विद्यार्थ्यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले होते. अभाविपच्या नेत्यावर हल्ला केल्याचा या सर्वांवर आरोप होता.
या घटनेनंतर रोहित तणावाखाली होता. त्याला गेल्या सहा महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळत नव्हती. रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कुणाच्याही नावाचा समावेश केला नव्हता मात्र संयुक्त कृती समितीमधील विद्यार्थ्यांच्या विविध गटांनी आंदोलन पुकारत केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. (वृत्तसंस्था)

केंद्राचे सत्यशेधक पथक
मानव संसाधन विकास मंत्रालयाने याप्रकरणी दोन सदस्यीय सत्यशोधक पथकाची स्थापना केली आहे. मंत्रालयातील विशेष अधिकारी (ओएसडी) शकिला टी. शम्सू यांच्या नेतृत्वातील चमू हैदराबादला जाऊन तथ्य जाणून घेतल्यानंतर मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. श्ािकला यांच्यासोबत उपसचिव सूरतसिंग यांचा समावेश आहे.
दत्तात्रेय यांना हटवा- काँग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते आरएनपीएन सिंग यांनी बंडारू दत्तात्रेय यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. भाजप आणि या पक्षावर नियंत्रण ठेवणाऱ्या रा.स्व. संघाचा दलितविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आल्याचा आरोप त्यांनी सोमवारी दिल्लीत नियमित पत्रपरिषदेत केला. रोहितने १८ डिसेंबर रोजी कुलगुरूंना पत्र पाठविले होते. पाच दिवसांपासून हे विद्यार्थी उपोषणावर होते. कुलगुरूंनाही पदावरून त्वरित बडतर्फ केले जावे. मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विद्यापीठाचा दौरा करून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, असेही ते म्हणाले.विद्यापीठात अभूतपूर्व संघर्ष
सोमवारी पोलिसांनी रोहितचा मृतदेह वसतिगृहातून नेण्यासाठी हालचाली केल्यानंतर विद्यार्थ्यांनी रोहितच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करीत जोरदार विरोध केला. विद्यार्थ्यांनी रोहितने फाशी घेतलेल्या खोलीला कुलूप लावले होते. विद्यार्थ्यांनी ‘पोलिसांनो, परत जा’ अशा घोषणा दिल्यानंतर तणाव वाढला होता. पोलिसांच्या दंगलविरोधी पथकाने बळाचा वापर करीत वसतिगृहात प्रवेश केला. परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. विद्यार्थी झोपले उघड्यावर
माझ्या मुलाला वसतिगृहात दोन आठवड्यांपासून उघड्यावर का झोपायला लावले? याचे उत्तर द्या, असा सवाल रोहितच्या आईने विद्यापीठाला केला आहे. रोहितला निलंबित करण्यात आल्याबद्दल आम्हाला काहीही कळविण्यात आले नाही, असा आरोपही तिने केला. त्याचवेळी रोहितच्या मृत्यूशी निगडित राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले. या ५ विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आल्याने ते विद्यापीठ परिसरात तंबूमध्ये झोपत होते. त्यांच्यावर बहिष्कार घातल्याचा आरोप संयुक्त कृती समितीने केला.बंडारू दत्तात्रेय यांनी गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहून विद्यापीठ परिसरात जातीय राजकारण खेळले जात असल्याची तक्रार करीत दलित विद्यार्थ्यांवर कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलिसांनी दत्तात्रेय, कुलगुरू पोडिले यांना आरोपी क्रमांक १ आणि २ मानले असून, भाजपाचे विधान परिषद सदस्य एन. रामचंद्र राव, अभाविपचे दोन नेते सुशील कुमार आणि कृष्णा चैतन्य यांच्यावरही आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Union minister Dattatreya Goetta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.