जेएनयू वादाचे देशभर पडसाद
By admin | Published: February 19, 2016 03:14 AM2016-02-19T03:14:56+5:302016-02-19T03:14:56+5:30
एनयू वादाचे गुरुवारी देशभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, आज कन्हैया कुमारला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्यावरील कारवाईला विरोध कर
नवी दिल्ली : जेएनयू वादाचे गुरुवारी देशभरात पडसाद उमटायला सुरुवात झाली असून, आज कन्हैया कुमारला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्यावरील कारवाईला विरोध करण्यासाठी आसाममध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला. गुवाहाटीमध्ये निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच कलाकार आणि शेतकरीही सहभागी झाले होते. केरळ आणि बिहारमध्येही कन्हैयाच्या अटकेचे पडसाद उमटले. अलिगड मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही कन्हैयाच्या अटकेविरुद्ध मोर्चा काढला होता.
पाटण्यात एआयएसएफचे विद्यार्थी नेते आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपच्या कार्यालयासमोर केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लाभले. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत जमावाला पांगविले. केरळ विधानसभेत मुख्य विरोधी माकपच्या नेतृत्वातील एलडीएफने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करीत स्थगन प्रस्ताव मांडला.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे...
दरम्यान, हा संपूर्ण वाद अयोग्य रीतीने हाताळल्याच्या निषेधार्थ जेएनयूमधील अभाविपचे अध्यक्ष राहुल यादव आणि संयुक्त सचिव प्रदीप नरवाल याच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. देशात तालिबानी संस्कृती नको. कायद्याला आपला मार्ग अवलंबू द्या, असे नरवाल याने म्हटले. आम्ही जेएनयूसाठी लढत राहू. कन्हैया किंवा उमर खालिद दोषी आढळल्यास कायदा त्यांना शिक्षा ठोठावेल, मात्र संपूर्ण विद्यापीठ, विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले व्हायला नको. असंतोषाचा आवाज व्यक्त व्हायलाच हवा, असेही तो म्हणाला.
आ. शर्मा पोलीस ठाण्यात
पतियाळा हाऊस कोर्टात भाकपच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडले गेलेले भाजपचे आमदार ओ.पी. शर्मा यांनी दिल्लीच्या टिळक मार्ग पोलिसांसमोर हजेरी लावली. सोमवारी पत्रकार आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत आ. शर्मा आणि तीन वकिलांना पोलिसांनी समन्स पाठविला होते. शर्मा यांना अटक करून लगेचच जामिनावर सोडण्यात आले.
मंत्र्याला मारण्याची धमकी
जेएनयूच्या मुद्यावर तोंड बंद ठेवा अन्यथा ठार मारू अशी मोबाईलवर धमकी मिळाल्याची माहिती दिल्लीचे मंत्री कपील मिश्रा यांनी दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला. सकाळी ८.४८ वाजता माझ्या मोबाईलवर कॉल आला. पुजारी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘अपनी जुबान बंद रखो वर्ना गोली मार देंगे’ असे तो म्हणाला, मी त्याला हटकले असता त्याने ‘अब तो तुम्हे पक्काही मार देंगे’ अशी धमकी दिल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
‘टीका करा, शिव्या नकोत’
देशभरात जेएनयू वादावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रीजिजू यांनी एक भारतीय म्हणून देशाचे ऐक्य आणि एकात्मतेशी संलग्नता राखावी. लोक सरकारवर टीका करायला मोकळे आहेत; मात्र देशाला शिव्या देऊ नका, असे आवाहन फेसबुक पोस्टवर
केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)