गुजरातमध्ये लागला सापाच्या नव्या जातीचा शोध
By Admin | Published: March 6, 2016 03:34 AM2016-03-06T03:34:11+5:302016-03-06T03:34:11+5:30
जैवविविधतेने विपुल अशा पश्चिम घाटामधील सापाची आणखी एक नवी प्रजाती उजेडात आली आहे. पश्चिम घाटाच्या गुजरातमधील प्रदेशामध्ये संशोधक राजू व्यास
मुंबई : जैवविविधतेने विपुल अशा पश्चिम घाटामधील सापाची आणखी एक नवी प्रजाती उजेडात आली आहे. पश्चिम घाटाच्या गुजरातमधील प्रदेशामध्ये संशोधक राजू व्यास यांच्यासह चौघांनी ही प्रजाती शोधली असून, या सापाचे आद्य जैवभूगोलशास्त्रज्ञ आल्फ्रेड रसेल वॉलेस यांच्या नावावरून ‘वॉलेसिओफिस’ असे नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये हा साप सापडल्यामुळे त्यास ‘गुजरातेनसिस’ असेही नाव देण्यात आले आहे.
जुलै २०१४मध्ये या सापाच्या शोधनिबंधावर काम सुरू करण्यात आले व वर्षभरानंतर त्याचे काम
पूर्ण झाले व अखेर ३ मार्च रोजी तो प्लोस वन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला. या संशोधकांमध्ये मुंबईतील तरुणांचाही सहभाग आहे. वॉलेसिओफिसला शोधणाऱ्या चमूमध्ये वडोदऱ्यामधील राजू व्यास यांच्यासह बंगळुरूचे झीशान मिर्झा, वलसाडचे हर्षिल पटेल आणि मुंबईच्या राजेश सानप यांचा समावेश आहे. हा साप सध्या गुजरातच्या सात स्थळांवर आढळून आला असून त्याबाबत संशोधन अद्याप झालेले नाही. राजू व्यास सध्या त्यावर विशेष प्रयत्न घेऊन संशोधन करीत आहेत. गेल्या १६ वर्षांमध्ये भारतात शंभराहून अधिक सरपटणाऱ्या व उभयचर प्रजातींचा शोध लागला
आहे.
गुजरातमध्ये २००९ साली पालीच्या एका प्रजातीचा शोध लागल्यानंतर या नव्या शोधामुळे पश्चिम घाटाचे अभ्यासकांच्या
दृष्टीने महत्त्व नव्याने वाढीस लागले आहे. (प्रतिनिधी)