एनआयए अधिका-याची हत्या संपत्तीच्या वादातून
By admin | Published: April 7, 2016 08:59 AM2016-04-07T08:59:21+5:302016-04-07T11:37:03+5:30
एनआयए अधिकारी मोहम्मद तंझील अहमद यांच्या हत्या प्रकरणाच्या कटाचा उत्तरप्रदेश पोलिसांकडून लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. ७ - एनआयए अधिकारी मोहम्मद तंझील अहमद यांच्या हत्या प्रकरणाच्या कटाचा उत्तरप्रदेश पोलिसांकडून लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी या प्रकरणी तंझील अहमद यांच्या जवळच्या नातेवाईकाला अटक केली असून, त्याने भाडोत्री मारेक-याकरवी ही हत्या घडवून आणली असे वृत्त आयबीएनने दिले आहे.
संपत्तीच्या वादातून ही हत्या झाली आहे. संपत्तीच्या एका व्यवहारात कमिशन देण्याचा आपला शब्द फिरवल्यामुळे ही हत्या झाल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. मुख्य मारेक-याला अटक केल्यानंतर पुढच्या काही तासातच उलगडा होईल अशी उत्तरप्रदेश पोलिसांना अपेक्षा आहे.
रविवारी रात्री विवाहसोहळयावरुन परतत असताना एनआयए अधिकारी तंझील अहमद यांची मारेक-यांनी बिजनोरमध्ये निर्घृण हत्या केली होती. त्यांनी तंझील यांची गाडी थांबवून जवळून त्यांच्यावर २१ गोळया झाडल्या होत्या. यात तंझील यांचा जागीच मृत्यू झाला तर, त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तंझील अहमद एनआयएमध्ये काम करत असल्याने सुरुवातीला पठोणकोट हल्ल्याच्या तपासाशी या हत्येचा संबंध जोडला गेला होता. एनआयए अधिका-याची हत्या झाल्याने उत्तरप्रदेश पोलिस आणि एटीएसने या प्रकरणाचा वेगवान तपास सुरु केला होता.