येडियुरप्पांकडे कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष
By admin | Published: April 9, 2016 01:00 AM2016-04-09T01:00:03+5:302016-04-09T01:00:03+5:30
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भारतीय जनता पक्षाने आता पुनर्वसन करण्याचे ठरवले असून, त्याचाच भाग म्हणून त्यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भारतीय जनता पक्षाने आता पुनर्वसन करण्याचे ठरवले असून, त्याचाच भाग म्हणून त्यांच्याकडे कर्नाटकाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यांची कर्नाटक प्रदेश भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. कर्नाटकात दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी त्यासाठीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असून, त्यामुळेच येडियुरप्पा यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमधील पक्षाची सूत्रे खा. केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे सोपवली आहेत. ते दलित समाजाचे आहेत. मायावती आणि मुलायमसिंग यादव यांच्याजवळ असलेला हा समाज भाजपकडे आणण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते.
पंजाब भाजपाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेले विजय सांपला हेही दलित समाजाचे आहेत. एकीकडे अकाली दल-भाजपा सरकारविरुद्ध नाराजी असून, दुसरीकडे पाळेमुळे रुजवण्यात आम आदमी पक्ष यशस्वी होत आहे. अशा स्थितीत दलित मतांवर डोळा ठेवूनच सांपला यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. याशिवाय तेलंगणात आ. डॉ. के. लक्ष्मण यांची तर अरुणाचल प्रदेशात तापीर गाओ यांची फेरनेमणूक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
> असहिष्णुतेचा आरोप म्हणजे धुके- भाजप
तिरुवनंतपुरम : काँग्रेस-डाव्यांनी केलेला असहिष्णुतेचा आणि जातीय फूट पाडण्याचा आरोप म्हणजे केवळ धुके असून जनतेचा त्यावर विश्वास नाही, असे भाजपने शुक्रवारी म्हटले.
विरोधकांकडे ज्यावेळी ठोस सांगण्यासारखे काही नसते त्यावेळी खोटे वातावरण निर्माण करणे हाच पर्याय असतो. मी तर त्याला धुके म्हणेल, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते एम.जे. अकबर यांनी म्हटले. काँग्रेसने क्षुद्र राजकारण चालविले आहे, हे दुर्दैव आहे. (वृत्तसंस्था)