‘एमबीबीएस’साठी ‘नीट’च!

By admin | Published: May 10, 2016 04:18 AM2016-05-10T04:18:13+5:302016-05-10T04:18:13+5:30

आगामी शैक्षणिक वर्षात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांचे देशभरातील सर्व प्रवेश केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक परीक्षेने होतील,

'Neat' for MBBS! | ‘एमबीबीएस’साठी ‘नीट’च!

‘एमबीबीएस’साठी ‘नीट’च!

Next

नवी दिल्ली/मुंबई : आगामी शैक्षणिक वर्षात एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांचे देशभरातील सर्व प्रवेश केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक परीक्षेने होतील, हा आधी देलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवल्याने या प्रवेशांसाठी महाराष्ट्र सरकारने ५ मे रोजी घेतलेली ‘एमएचटी-सीईटी’ निरर्थक ठरली आहे. परिणामी, राज्याची ‘सीईटी’ दिलेल्या सुमारे साडे चार लाख विद्यार्थ्यांपैकी ज्यांना ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’ला प्रवेश घ्यायचा असेल त्यांना जुलैमध्ये पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस हे वैद्यकीय तसेच बीडीएस या दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याने ‘सीईटी’ घेतली होती. आता एमबीबीएस व बीडीएसचे प्रवेश ‘नीट’नुसारच करावे लागतील. अन्य वैद्यकीय शाखांचे प्रवेश ‘सीईटी’नुसार केले जातील.
२०१६-१७च्या एमबीबीएस व बीडीएस प्रवेशांसाठी संपूर्ण देशाच्या पातळीवर एकच ‘नीट’ परीक्षा दोन टप्प्यांत घेण्याचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने २८ एप्रिल रोजी मंजूर केले होते. त्या वेळी राज्याची ५ मेची ‘सीईटी’ आधीच ठरलेली होती. त्यामुळे निदान या वर्षापुरते तरी महाराष्ट्राला ‘नीट’मधून वगळावे, यासाठी राज्य सरकारने याचिका केली. इतर सात राज्य सरकारांनी, काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी व त्यांच्या संघटनांनी याचिका केल्या होत्या. त्यावर ३ मे रोजी सुनावणी सुरू झाली तेव्हा ज्या राज्यांच्या हो घातलेल्या स्वतंत्र परीक्षेला आम्ही मनाई केलेली नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने ५ मेची ‘सीईटी’ पार पडली होती. परंतु या परीक्षेच्या भवितव्याविषयी अनिश्चितता कायम होती.
दुसरा टप्पा २४ जुलैला
न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेचा आदेश देण्यापूर्वी ‘आॅल इंडिया प्री मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट’ (एआयपीएमईटी) १ मे रोजी घेण्याचे जाहीर झाले होते. तीच परीक्षा ‘नीट’ परीक्षेचा पहिला टप्पा म्हणून घेण्यात आली. देशभरातील ४२ शहरांमध्ये १४०० परीक्षा केंद्रांवर सुमारे ६.५ लाख विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती.
‘नीट’चा दुसरा टप्पा २४ जुलै रोजी व्हायचा आहे. कोर्टाच्या सुधारित आदेशामुळे ‘नीट-२’ देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ‘नीट-२’च्या २४ जुलै या नियोजित तारखेत गरज पडल्यास बदल करण्याची मुभा न्यायालयाने सीबीएसई व एमसीआयला दिली.
>निकालपत्र वेबसाईटवर
न्या. अनिल आर. दवे, न्या. शिव कीर्ती सिंग व न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या ‘नीट’ परीक्षेचा मूळ आदेश देणाऱ्या खंडपीठापुढे सोमवारी सायंकाळी या सर्व याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर रात्री खंडपीठाचे १३ पानी निकालपत्र न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले. त्यातील, ‘वरील बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांना फक्त ‘नीट’ परीक्षेच्या माध्यमातूनच एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतील, हेही स्पष्ट करण्यात येत आहे,’ या शेवटच्या एका वाक्याने राज्याची ‘सीईटी’ या दोन अभ्यासक्रमांसाठी तरी निरर्थक ठरली.
‘नीट’च्या दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षेसंबंधी न्यायालयाने आधीच्या आदेशात थोडा फेरबदल व खुलासा केला. ज्यांनी ‘नीट-१’ची तयारी केली होती; परंतु ज्यांना त्या परीक्षेला बसता आले नाही अथवा ही परीक्षा फक्त १५ टक्के अ.भा. कोट्यासाठी आहे व इतर प्रवेश परीक्षा देण्याचीही आपल्याला नंतर पुन्हा संधी मिळेल या आशेने ज्यांनी ‘नीट-१’ची गांभीर्याने तयार केली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी न्यायालयाने सुधारित आदेश दिला. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना ‘नीट-२’ देता येईल.
‘नीट’ पूर्णपणे विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी यासाठी न्यायाल्याने निवृत्त सरन्यायाधीश न्या. आर.एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती देखरेख करेल, असे निर्देशही न्यायालयाने दिले.- आणखी वृत्त/४
>‘नीट’ सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित आहे. मात्र, एचएससी आणि सीबीएससी अभ्यासक्रमात फरक आहे. हा फरक भरुन काढण्यास पुढील महिना-दीड महिन्यात अधिकचे तास घेवून नीटची तयारी करता येईल का, याची पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी प्राध्यापक-शिक्षक संघटना, शिक्षण तज्ञ आणि अधिका-यांची बैठक बोलावण्यात आली आहे. - विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री

Web Title: 'Neat' for MBBS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.