पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदव्या ख-याच - दिल्ली विद्यापीठ
By admin | Published: May 10, 2016 07:42 PM2016-05-10T19:42:37+5:302016-05-10T19:55:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीएची पदवी खरी असल्याचे दिल्ली विद्यापीठाने मंगऴवारी स्पष्ट केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीएची पदवी खरी असल्यावर दिल्ली विद्यापीठाने मंगऴवारी शिक्कामोर्तब केले. मोदींची पदवी खरी असून यासंदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. पदवीमध्ये कोणताही घोटाळा नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाने मोदींची पदवी खोटी असून, भाजपने देशाची फसवणूक केली आहे असा आरोप केला होता. नरेंद्र मोदींच्या पदवीशी संबंधित सर्व आवश्यक रेकॉर्ड आपल्याकडे असून, मोदींच्या पदवीवर १९७९ चा उल्लेख ही आपल्याकडून झालेली चूक असल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे. मोदींना १९७८ सालीच बीएची पदवी मिळाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
आम्ही आमचे रेकॉर्ड तपासले. नरेंद्र मोदींची पदवी ही पूर्णपणे खरी आहे. त्यांनी १९७८ साली परीक्षा दिली आणि त्यांना १९७९ साली पदवी मिळाली असे दिल्ली विद्यापीठाचे रजिस्टार तरुण दास यांनी सांगितले. आपचे नेते मोदींची पदवी तपासण्यासाठी दिल्ली विद्यापीठात गेले होते. त्यानंतर काहीवेळाने दिल्ली विद्यापीठाने हा खुलासा केला.
विद्यापीठाच्या अधिका-यांनी आप नेते आशुतोष, संजय सिंह, दिलीप पांडे, आशिष खेतान यांना विद्यापीठाच्या कुलगुरुंना भेटू दिले नाही. सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदींची बीए आणि एमएची पदवी सादर केली होती.
यावेळी त्यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खोटे आरोप केल्यामुळे माफी मागावी अशी मागणी केली होती. पण त्यानंतर आपने काहीवेळात पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या पदवीमधील वर्षांचा घोळ दाखवून मोदींच्या पदव्या खोटया असल्याचा आरोप केला होता.