इस्रो घेणार भरारी; आज झेपावणार स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल!
By admin | Published: May 23, 2016 04:11 AM2016-05-23T04:11:54+5:302016-05-23T04:11:54+5:30
अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या अवकाशयानाची (स्पेस शटल) पहिली चाचणी सोमवारी होणार आहे. पुन्हा वापर करता येईल, असे अवकाशयान तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने काम
चेन्नई : अवकाशात उपग्रह सोडण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या अवकाशयानाची (स्पेस शटल) पहिली चाचणी सोमवारी होणार आहे. पुन्हा वापर करता येईल, असे अवकाशयान तयार करण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने काम केले असून, ही चाचणी म्हणजे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने ‘आरएलव्ही-टीडी’ हे यान तयार केले आहे. विमानासारखे पंख असलेल्या या यानाची श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाशतळावर चाचणी होणार आहे. उपग्रहाला अवकाशात सोडल्यानंतर यानाला विमानाप्रमाणे पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या तंत्रज्ञानावर इस्रोने
काम केले असून, उद्याच्या चाचणीतून त्याचे निष्कर्ष जगासमोर येणार
आहेत.
याआधी अंतराळ तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या अमेरिकेसह इतरही काही देशांनी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी व अंतराळ सफरींसाठी अशा ‘स्पेस शटल’चा वापर केला. मात्र कालांतराने त्याला होणारे अपघात व न परवडणाऱ्या आर्थिक गणितांमुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली वा अशा वाहनांचा वापर बंद केला. भारताच्या अभियंत्यांनी मात्र काटकसरीवर भर देत रॉकेटच्या पुनर्वापरावर भर देण्याचे ठरवले आहे.
फायदा काय?
ही चाचणी यशस्वी झाल्यास एखादा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्यासाठी वापरलेल्या यानाचा पुन्हा वापर करणे शक्य होईल.
या तंत्रज्ञानामुळे उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च दहा पटीने कमी होणार आहे. अशा प्रकारच्या यानाच्या अत्याधुनिक आवृत्तीचा मानवी अवकाश मोहिमांसाठी वापर होऊ शकेल.
दशकभराचा कालावधी लागेल
आरएलव्ही-टीडी यानाची ही प्राथमिक चाचणी असल्याने हे यान उद्या नियंत्रितपणे बंगालच्या
खाडीत उतरवण्यात येणार आहे. या चाचणीचा कालावधी दहा मिनिटांचा असेल. स्वदेशी बनावटीचे, पूर्णपणे विकसित आणि पुन्हा वापरता येण्याजोगे अवकाशयान तयार करण्यासाठी दशकभराचा कालावधी लागेल, असे विक्र म साराभाई अवकाश केंद्राचे संचालक के. सिवान यांनी सांगितले.