जोगी, कामत यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसमध्ये भूकंप
By admin | Published: June 8, 2016 02:58 AM2016-06-08T02:58:18+5:302016-06-08T02:58:18+5:30
काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे.
शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- काँग्रेसचे नेतेद्वय अजित जोगी आणि गुरुदास कामत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे पक्षात भूकंप आला आहे. एकीकडे कामत यांच्याशी चर्चा सुरू असून दुसरीकडे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत असताना महत्त्वाचे नेते पक्षातून बाहेर का पडत आहेत यावर विचारमंथन सुरू आहे.
दरम्यान छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री असलेले अजित जोगी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यावर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांची काँग्रेस कार्यकारिणीसोबत इतर पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे छत्तीसगडचे प्रभारी व्ही.के. हरिप्रसाद यांनी ही माहिती दिली. पक्षाचे महासचिव असलेले गुरुदास कामत यांच्याबाबत मात्र काँग्रेसने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. कारण त्यांचे मन वळविण्यात येईल असा विश्वास पक्षाला आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उभय नेत्यांनी उपेक्षा सहन न झाल्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मेघालयातही गडबड याआधी झाली वा आता सुरू आहे. परिणामी राहुल गांधी यांनी बऱ्याच काळापासून प्रलंबित संघटनात्मक फेरबदलाच्या प्रक्रियेला वेग दिला आहे.
पक्षाचे महासचिवही बदलले जाणार असून राहुल गांधी यांचे निकटस्थ मानले जाणारे राजू, जितीनप्रसाद, भँवर जीतेंद्र सिंग यांच्यासारख्या तरुण नेत्यांना नव्या चमूत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची तयारी सुरू आहे.