‘पठाणकोट’चा सूत्रधार पाकमधून झाला पसार
By admin | Published: June 17, 2016 02:56 AM2016-06-17T02:56:09+5:302016-06-17T02:56:09+5:30
पठाणकोट हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना फोनवरून सूचना देणारा ‘जैश ए मोहंमद’चा नेता अफगाणिस्तानात पळाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात भारताचे सात लष्करी जवान शहीद झाले होते.
लाहोर : पठाणकोट हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांना फोनवरून सूचना देणारा ‘जैश ए मोहंमद’चा नेता अफगाणिस्तानात पळाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात भारताचे सात लष्करी जवान शहीद झाले होते.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर २ जानेवारी रोजी हल्ला केला होता. हल्ल्यादरम्यान त्यांना पाकिस्तानातून सूचना दिल्या जात होत्या. या सूचना देणारा म्होरक्या अफगाणिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे या हल्ल्याचा तपास करणाऱ्या संयुक्त चौकशी पथकातील एका सदस्याने गुरुवारी पीटीआयला सांगितले. हा नेता विशीतील असून, पठाणकोट हल्ल्यादरम्यान तो पाकच्या आदिवासी भागातून दहशतवाद्यांना विविध सूचना देत होता. हल्ल्यादरम्यान त्याने दहशतवाद्यांशी १८ वेळा दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. सुरक्षा यंत्रणांनी पाकच्या आदिवासी भागांत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, तो अफगाणिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे वृत्त आहे, असे या अधिकाऱ्याने जैशच्या त्या नेत्याचे नाव उघड न करता सांगितले. (वृत्तसंस्था)
तपास संस्थांवर दबाव
पठाणकोट प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य हुडकून काढण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा तपास संस्थांवर प्रचंड दबाव आहे. पंजाब प्रांताच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने पठाणकोट हल्ल्याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल
दाखल केला आहे.
एनआयएची पुन्हा विनंती
पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यास राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकाला पाकिस्तानचा दौरा करण्याची परवानगी मिळावी म्हणून पाकिस्तान सरकारशी संपर्क साधण्याची विनंती एनआयएने परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे.