सावधान - महिलांनो व्हॉट्स अॅप जपून वापरा - हायकोर्ट
By Admin | Published: June 27, 2016 04:44 PM2016-06-27T16:44:21+5:302016-06-27T16:44:48+5:30
मित्र - मैत्रिणींशी व्हॉट्स अॅपवर संवाद साधताना महिलांनी सावध रहावं, प्रोफाइल पिक्चर ठेवताना, फोटो शेअर करताना काळजी घ्यावी असा सल्ला मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27 - मित्र - मैत्रिणींशी व्हॉट्स अॅपवर संवाद साधताना महिलांनी सावध रहावं, प्रोफाइल पिक्चर ठेवताना, फोटो शेअर करताना काळजी घ्यावी असा सल्ला मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला आहे. एका तरुणाने 16 वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं व तिच्यावर बलात्कार करून त्याचं चित्रण केलं. तसेच, हा व्हिडीयो व्हॉट्स अॅपवर टाकायची धमकी दिली, या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी व्हॉट्स अॅपच्या तोट्यांबाबत महिलांना जागरूक होण्याचा सल्ला दिला आहे. या गुन्ह्याप्रकरणी न्यायाधीशांनी आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यासही नकार दिला आहे.
मुलगी हरवल्याची तक्रार गेल्या महिन्यात वडिलांनी दिली होती. पोलीसांनी तपास केला असता अजिथ नावाच्या तरूणाने तिला पळवल्याचे आणि बलात्कार केल्याचे आढळले. तसेच, तिला ब्लॅकमेल करून अजिथने तिला त्याच्या मित्रांबरोबरही शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीस एस. वैद्यनाथन यांनी आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत जामीन देण्यास नकार दिला. व्हॉट्स अॅपमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
अशा तंत्रज्ञानाचा विधायक कामासाठी उपयोग होत असला तरी गुन्ह्यांसाठी होणारा वापर चिंताजनक असल्याचे वैद्यनाथन म्हणाले. त्यामुळे महिलांनीही व्हॉट्स अॅपसारखी साधनं वापरताना काळजी घ्यायला हवी असा सल्ला त्यांनी दिला आहे.