उत्तराखंडात ढगफुटी

By admin | Published: July 2, 2016 05:22 AM2016-07-02T05:22:52+5:302016-07-02T05:22:52+5:30

उत्तराखंडमधील पिठोरागड आणि चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला

Cloudburst in Uttarakhand | उत्तराखंडात ढगफुटी

उत्तराखंडात ढगफुटी

Next


पिठोरागड, गोपेश्वर : उत्तराखंडमधील पिठोरागड आणि चमोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून, तिथे किमान ३0 जणांचा मृत्यू झाला आहे. भुईसपाट झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबून मरण पावले असावेत, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ते दबून मेले आहेत वा वाहून गेले आहेत.
या प्रकारांमुळे उत्तराखंडातील लोकांमध्ये घबराट पसरली असून, दोन वर्षांपूर्वी अशाच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले होते, तसेच आताही होते की काय, अशी शंका त्यांना वाटत आहे. ढगफुटी आणि जोरदार पावसामुळे अलकनंदा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून, अनेक भागांत पुरामुळे घरे पाण्याखाली गेली आहेत. रस्तेही अनेक ठिकाणी खचले असून, तेथील राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अधिकृत सूत्रांनुसार, पिठोरागड जिल्ह्याच्या सिंघली भागात ढगफुटीमुळे ८ लोक मृत्युमुखी पडले, तर २५ जण बेपत्ता आहेत.
>मदतकार्यासाठी केंद्रीय पथके रवाना
केंद्राने उत्तराखंडमधील बचाव व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके शुक्रवारी रवाना केली असून, या राज्याला आवश्यक ती सर्व मदत पुरविण्याची ग्वाही दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. परिस्थिती हाताळण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी रावत यांना दिली.एनडीआरएफची काही पथके आपत्तीग्रस्त भागात पाठविण्यात आली असून, आणखी काही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे राजनाथसिंह यांनी रावत यांना सांगितले.
जखमींना त्वरित उपचार उपलब्ध : मुख्यमंत्री हरीश रावत यांनी प्रशासनाला जखमींना त्वरित उपचार उपलब्ध करून देण्याचे, तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे आदेश दिले. याशिवाय त्यांनी गढवाल आणि कुमाऊ या दोन्ही विभागाच्या आयुक्तांना आपत्तीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्याची स्वत: देखरेख करण्यास सांगितले. पीडितांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरही पुरविले जात आहे.
>ढगफुटीमुळे पिठोरागड जिल्ह्यातील अनेक घरे भुईसपाट
‘सिंहली भागात पाच, तर थल गावात तीन मृतदेह हाती लागले असून, लष्कर व निमलष्करी दलाच्या मदतीने इतर मृतदेहांचा शोध सुरू आहे,’ असे पिठोरागडचे जिल्हाधिकारी म्हणाले.ढगफुटीचा तडाखा बसलेल्या गावांतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येत आहे. ढगफुटीमुळे पिठोरागड जिल्ह्यातील सात गावांत अनेक घरे भुईसपाट झाली.
>पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मी पीडित कुटुंबांच्या दु:खात सहभागी असून, तेथील जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशा करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
>मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख
मुख्यमंत्री हरीश रावत यांनी मुसळधार पाऊस, ढगफुटी व दरडी कोसळण्याच्या घटनांतील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. ही दु:खद घटना असून, राज्य सरकार पीडितांसोबत आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Cloudburst in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.