काश्मीर धगधगतेच !

By admin | Published: July 12, 2016 12:53 AM2016-07-12T00:53:14+5:302016-07-12T00:53:14+5:30

तीन दिवसांपासून हिंसाचाराचा फटका बसलेले काश्मीर अद्यापही धगधगत असून, सोमवारी सोपोरमध्ये जमावाने पोलीस ठाण्याला पेटवून दिले आणि पुलवामात हवाई दलाच्या विमानतळाला लक्ष्य केले.

Kashmir shines! | काश्मीर धगधगतेच !

काश्मीर धगधगतेच !

Next

श्रीनगर/नवी दिल्ली : तीन दिवसांपासून हिंसाचाराचा फटका बसलेले काश्मीर अद्यापही धगधगत असून, सोमवारी सोपोरमध्ये जमावाने पोलीस ठाण्याला पेटवून दिले आणि पुलवामात हवाई दलाच्या विमानतळाला लक्ष्य केले.
काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले. निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील चकमकी अजूनही सुरूच आहेत. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा शुक्रवारी मृत्यू झाल्यापासून खोऱ्यात २३ जण ठार २५० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. संचारबंदी व फुटीरवाद्यांनी वनीच्या हत्येच्या निषेधार्थ केलेल्या संपामुळे दैनंदिन जीवन सलग चौथ्या दिवशीही विस्कळीत झाले. मोबाईल इंटरनेट सेवा गेल्या शनिवारपासून बंद आहे.
दक्षिण काश्मीरमधील पोलीस ठाण्यातून बेपत्ता झालेल्या शस्त्रांचा सुरक्षा दलांना शोध लागलेला नाही. शनिवारी या ठाण्यावर जमावाने हल्ला केल्यानंतर ३५ अ‍ॅसॉर्टेड रायफल्सह अनेक शस्त्रे आणि दारुगोळा बेपत्ता झालेला आहे, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
काश्मीरमधील जीवित हानीबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र दुख: व्यक्त करून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असे सोमवारी म्हटले.सुरक्षा दले कमालीचा संयम राखून निदर्शकांना ठार मारणे थांबवत नाहीत तोपर्यंत खोऱ्यात शांतता निर्माण होणार नाही, असे ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला सांगितले. राजनाथ सिंह
यांनी माझ्याशी संपर्क साधल्यावर मी त्यांना हे सांगितले, असे अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान पाकिस्तानने सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. (वृत्तसंस्था)

पाकला धक्का : हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी हा काश्मीरमधील चकमकीत ठार झाल्याचा फायदा उघटवण्याचे प्रयत्न पाकने सुरू केले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दले जबरदस्ती करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला. बुरहानच्या मृत्युमुळे आम्हाला धक्का बसल्याचे सांगून, त्यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाईचा निषेध केला. भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांचा सूत्रधार असलेल्या हफिज सईदने वनीच्या मृत्यूबद्दल प्रार्थना सभा आयोजित केली आहे.

काश्मीरमधील अस्थिरता लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सोमवारी येथे परतले. ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केनियाच्या दौऱ्यावर होते. खोऱ्यातील परिस्थितीवर उपाय सापडतील, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमरनाथ यात्रेकरू अडकले
1हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद असल्याने शेकडो अमरनाथ यात्रेकरू येथे अडकून पडले आहेत. ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’चा कमांडर बुऱ्हाण वणी मारला गेल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

2सोनमर्ग भागातील बालटालमार्गे यात्रा केलेले अनेक यात्रेकरू श्रीनगरच्या ‘टुरिस्ट रिसेप्शन सेंटर’मध्ये अडकून पडले आहेत. बालटाल तळ शिबिराहून रात्री एक वाजता निघालेले भाविक पहाटे श्रीनगरमध्ये दाखल झाले.
3‘आम्ही ८ जुलैला शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी मध्यरात्री आम्हाला बालटालचे तळ शिबीर सोडण्यास सांगण्यात आले. श्रीनगर येथे तुमच्यासाठी बसची व्यवस्था केली असून, त्या तुम्हाला जम्मूला नेतील, असे सांगितले. मात्र येथे एकही बस नाही. आम्ही तेव्हापासून करीत आहोत. आम्ही कधी जम्मूला पोहोचू, असा प्रश्न बिहारहून आलेले यात्रेकरू प्रमोद कुमार यांनी विचारला.

विरोधकांशी चर्चा
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोनिया गांधी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून खोऱ्यात शांतता आणि सामान्य परिस्थिती निर्माण होण्यासाठीच्या प्रयत्नांवर या दोघांशी चर्चा केली.
विरोधी नेत्यांना विश्वासात घेण्याचा हा गृहमंत्र्यांचा प्रयत्न होता. राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा दुसऱ्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना तेथे सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजा, असे आदेश दिले.

Web Title: Kashmir shines!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.