हवाई दलाचे विमान २९ जणांसह बेपत्ता
By admin | Published: July 23, 2016 06:11 AM2016-07-23T06:11:02+5:302016-07-23T06:11:02+5:30
भारतीय हवाई दलाचे एएन ३२ वाहतूक सेवेतील विमान शुक्रवारी २९ जणांसह बेपत्ता झाले आहे.
चेन्नई/नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे एएन ३२ वाहतूक सेवेतील विमान शुक्रवारी २९ जणांसह बेपत्ता झाले आहे. २९ जणांत सहा कर्मचारी आहेत. विमान चेन्नईजवळून पोर्टब्लेअरला निघाले होते. विमानाचा शोध आणि बचावकार्यासाठी हवाई दल, नौदल व किनारारक्षक दलाकडून १३ जहाजांसह पाच विमानांची मदत घेतली जात आहे.
सकाळी बेपत्ता झालेल्या या विमानाचा रात्रीपर्यंत शोध न लागल्याने हवाई दलाचे अधिकारी चिंतेत आहेत. हे मालवाहू विमान कोसळले की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्यात असलेल्या २९ जणांचे कुटुंबीयही काळजीमध्ये आहेत.
विमानाने तंबारम येथून सकाळी ८.३० वाजता उड्डाण केल्यानंतर त्याचा शेवटचा रेडिओ संपर्क १६ मिनिटांनी म्हणजे सकाळी ८.४६ वाजता नोंदला होता. २९ जणांमध्ये हवाई दलाचे दोन पायलट, नेव्हिगेटर आणि नौदल व लष्कराचे कर्मचारी आहेत. विमान त्याच्या नेहमीच्या कुरिअर सेवेच्या कामात होते. त्याच्या वेळापत्रकानुसार पोर्टब्लेअरला ते ११.३० वाजता पोचायला हवे होते, परंतु तसे झाले नाही, अशी माहिती हवाई दल प्रवक्ते विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी दिली.
>शेवटचा संपर्क केव्हा ?
विमानाचा शेवटचा संपर्क झाला तेव्हा
ते सुमारे २३ हजार फूट उंचीवर होते. बंगालच्या समुद्रात विमानाचा शोध घेण्यासाठी नौदलाने सर्व शक्ती लावली असल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी दिली.