भारताच्या बलुचिस्तानच्या भुमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?
By admin | Published: September 18, 2016 02:46 PM2016-09-18T14:46:04+5:302016-09-18T14:46:04+5:30
उरी दहशतवादी हल्ल्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी पाकिस्तानवर आरोप केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला घडवला असावा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : आज पहाटे बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवादयाने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर भारतीय जवानांना चारही दहशतवादयाचा खात्मा करण्यात यश आले आहे. या हल्ल्यासाठी केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी पाकिस्तानवर आरोप केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने हा हल्ला घडवला असावा अशी शक्यताही केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिका-यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकराने बलुचिस्थान बाबत उचलेल्या पावलामुळे पाकिस्तानला मिरच्या चांगल्या झोंबलेल्या दिसत असल्याचे नेटिझमचे मत आहे.
१५ ऑगस्टनंतर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणा-या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू झाली. यावेळी आक्रमक झालेल्या बलूची लोकांनी पाकिस्तानचा झेंडाही तुडवला आहे. तसेच सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागांतही पाकिस्तानच्या अन्यायाविरोधात जोरदार आंदोलनं झाली. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. तर पाकिस्तान इथे नरसंहार करतो. पाकिस्तानी सैन्य प्रत्येक दिवशी डझनभर तरुणांची हत्या करतो. हजारो नागरिक बेपत्ता आहेत. पाकिस्तानने बलुचांना गुलाम बनवलं आहे, असा दावा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक नेते ब्रह्मदाग बुगती यांनी केला होता.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना जबरदस्तीनं बलुचिस्तानवर उघडपणे बोलून धोक्याची सीमारेषा ओलांडली आहे, असं वक्तव्य पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या नफिस झकेरिया यांनी केलं होत.
भारताच्या इतिहासात प्रथमच अधिकृतपणे भारताने पाकिस्तानच्या विरोधात बलुचिस्तानचा प्रश्न उघड केला होता, बलुची नेत्यांनी त्याचे जाहीर स्वागतही केले जात आहे. ब्राहमदाह बुगती, शेर मोहम्मद बुगती आणि अझिझुल्लाह बुगती या बलुचिस्तानमधल्या व आता स्वित्झर्लंडच्या आश्रयाला असलेल्या नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, बलुची नेत्यांची ही जुनी मागणी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाकिस्तानविरोधात बलुचिस्तानसाठी भारतीय कागदपत्रांच्या आधारे मोर्चेबांधणी करू अशी त्यांची भूमिका आहे. बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे हे नेते असून पाकिस्तानने हा पक्ष बेकायदेशीर ठरवला आहे. तर आम्ही नरेंद्र मोदींचे आभारी असून त्यांना आमचा पाठिंबा आहे, यामध्ये कुणाला काय वाटायचे ते वाटू अशी स्पष्टोक्ती एका बलुची नेत्यांनी दिली आहे.
हा हल्ला पाकिस्ताननेच केला आहे. गृह मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला गांभीर्याने घेतला असून आता हल्ले सहन केले जाणार नाहीत असे वकत्व्य संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केलं आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. पाकिस्तानच्या अत्याचाराला कंटाळलेल्या बलूची लोकांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दिली आहे. विशेष म्हणजे बलुचिस्तानमधले शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकले होते.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बुरहान वानी या दहशतवाद्याचा खात्मा झाल्यापासून दंगल सुरु होती. पाकिस्ताननेही उघडपणे या आंदोलनाचे समर्थन करत बुरहान वानीला शहीदाचा दर्जा दिला होता. दोन महिने सुरु असलेल्या हिंसाचारात सुमारे ८६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते. आता अथक प्रयत्नानंतर हा हिंसाचार थांबवण्यात यश येत असतानाच उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे.