पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाही - सलमान खान
By admin | Published: September 30, 2016 03:23 PM2016-09-30T15:23:17+5:302016-09-30T17:47:11+5:30
'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशा शब्दांत अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' करत ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर संपूर्ण देशात अभिमानाचे वातावरण असून 'उरी' हल्ल्याचा योग्य बदला घेतल्याची भावनाही व्यक्त होत आहे. ' इम्पा'नेही यापुढे पाक कलाकारांना भूमिका न देण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सलमानला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हा ' सर्जिकल स्ट्राईक' योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मात्र पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू न देण्याच्या निर्णयाबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला असता सलमानने ' कलाकार म्हणजे दहशतवादी नव्हेत असे सांगत ही बंदी योग्य नसल्याची भूमिका मांडली.
कला व दहशतवाद दोन वेगळे मुद्दे असून त्यांची सरमिसळ करू नका. पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात काम करण्यासाठी येतात, मग त्यांना बंदी कशासाठी घालायची' असे विचारत सलमानने ही पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले.
मित्रासाठी सलमानने घेतली भूमिका ?
सलमान व दिग्दर्शक करण जोहर मित्र असून करणचा ' ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये रणबीर कपूर, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा आणि पाकिस्तानी कलाकार फवाद खान यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. ' येत्या ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत जा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू' असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता. त्यानंतर सर्व बाजूने पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापू लागले होते. मनसेच्या भूमिकेमुळे वैतागलेल्या करण जोहरने 'पाकिस्तानी कलाकारांना विरोध करून दहशतवादी हल्ले रोखले जाऊ शकत नाहीत' अशी टिपण्णी करत ' दरवेळी आपल्याला सॉफ्ट टार्गेट' केलं जात असा आरोप केला होता. त्यानंतर खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काल करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने केली. त्यानंतर सलमानने त्याच्या मदतीसाठी धाव घेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनाच फोन लावला. सलमान आणि राज ठाकरे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्याने राज यांना फोन करून ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘रईस’ हे दोन्ही चित्रपट अडथळ्याविना प्रदर्शित व्हावे अशी विनंती केली. त्याचाच एक भाग म्हणून एकीकडे सर्जिकल स्ट्राईक्सची कृती योग्य ठरवतानाही सलामानाने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे. .