मोहम्मद अखलाखच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू
By admin | Published: October 5, 2016 10:55 AM2016-10-05T10:55:19+5:302016-10-05T10:58:18+5:30
हम्मद अखलाख हत्या प्रकरणातील आरोपीचा दिल्लीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - उत्तरप्रदेशातील दादरी येथील मोहम्मद अखलाख हत्या प्रकरणातील आरोपीचा दिल्लीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. हा आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरुन जमावाने केलेल्या मारहाणीत अखलाखचा मृत्यू झाला होता.
रॉबिन उर्फ रवीने (२०) दोन दिवसांपूर्वी वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले. किडनी फेल झाल्यामुळे रवीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कुटुंबियांनी मात्र रवीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे.
रुग्णालयात आणले तेव्हा रवीची स्थिती अतिशय खराब होती. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढले होते. किडनी फेल झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असे एलएनजेपी रुग्णालयाने सांगितले. रवीला नोएडाच्या तुरुंगात मारहाण करण्यात आली. वर्षभरापासून तो त्या तुरुंगात होता. तुरुंग प्रशासन त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.
या हत्या प्रकरणातील १८ आरोपींपैकी रवी एक होता. तीन आरोपी जामिनावर बाहेर आहेत. घरात बीफ असल्याच्या संशयावरुन जमाव अखलाखच्या घरी गेला व त्यांनी अखलाख आणि त्याचा मुलगा दानिशला मारहाण केली. यात अखलाखचा मृत्यू झाला. बीफ खाणे हा उत्तरप्रदेशात गुन्हा नाही. पण गायीची हत्या करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून यासाठी सातवर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.