BMW ठरली पांढरा हत्ती, दीपा कर्माकर गाडी परत करणार?
By admin | Published: October 12, 2016 11:15 AM2016-10-12T11:15:03+5:302016-10-13T16:24:40+5:30
रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जगाची मने जिंकणाऱ्या भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्मकारने आपल्याला भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू गाडी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर सर्वांची वाहवा लुटणारी भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकरने भेट मिळालेली महागडी बीएमडब्ल्यू कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी दीपासह, कुस्तीपटू साक्षी मलिक, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना बीएमडब्ल्यू कार भेटस्वरुपात दिली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या हस्ते ही कार या खेळाडूंना देण्यात आली होती.
दरम्यान, बीएमडब्ल्यू परत करण्याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दीपाकडून आलेली नाही. मात्र, आगरतलासारख्या छोट्या शहरातील अरुंद आणि छोट्या रस्त्यांवर बीएमडब्ल्यू चालवणं कठीण असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच, बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या कारची देखभाल करण्याचा खर्चदेखील परवडण्यासारखा नाही, असेही त्यांचे म्हणणे असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा :
(सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक पदक विजेत्यांना BMW भेट)
(ते सात दिवस, सात वर्षांसारखे : दीपा कर्माकर)
(वाढदिवशी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर नजरकैदेत)