गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करणार - लष्कर
By Admin | Published: October 15, 2016 08:24 AM2016-10-15T08:24:38+5:302016-10-15T08:24:38+5:30
लष्कराने सर्जिंकल स्ट्राईक कारवाईची माहिती संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीसमोर मांडली, यावेळी लष्कराने गरज पडल्यास पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असं सांगतिलं आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - गरज पडल्यास पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असं लष्कराने सांगितलं आहे. लष्कराने सर्जिंकल स्ट्राईक कारवाईची माहिती संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीसमोर मांडली. या बैठकीस समितीचे तीन सदस्य उपस्थित होते. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी भारतीय जवानांनी 29 सप्टेंबर रोजी केलेल्या लष्करी कारवाईचा लेखाजोखा सादर केला. त्यावेळी राजकीय पक्षांनाही लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकची माहिती दिली. यावेळी लष्कराने गरज पडल्यास पुन्हा सर्जिंकल स्ट्राईक करु असं सांगतिलं आहे.
सर्जिंकल स्ट्राईकवरुन गेल्या काही दिवसांपासून पुरावे मागण्यात येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर लष्कराकडून खासदारांना याबाबत माहिती देण्यात आली. डीजीएमओने पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहितीनंतर आणि सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रथमच लष्कराने खासदारांना माहिती दिली आहे.
नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्याच आधारे ही कारवाई करण्यात आली असं लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी समितीला सांगितलं आहे. बिपीन रावत यांनी संपुर्ण कारवाई कशाप्रकारे पार पाडली, कशाप्रकारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, तसंच आपले जवान सुरक्षितरित्या माघारी कसे आले यासंबंधी थोडक्यात माहिती दिली.
लष्कराने या संवेदनशील विषयाबाबत त्रोटक स्वरूपात माहिती दिली असून आम्ही विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तर देणे टाळले, असे एका सदस्याने सांगितले.
कॉंग्रेस नेते आणि समितीचे सदस्य मधुसुदन मिस्री यांनी या वेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला; पण पॅनलचे प्रमुख मेजर जनरल बी. सी. खांडुरी (निवृत्त) यांनी याबाबत बोलणे टाळले. या वेळी दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे एका सदस्याने सांगितले. तत्पूर्वी संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत स्थायी समितीसमोर आपले म्हणणे मांडणार होते; पण नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला होता. याला कॉंग्रेसच्या सदस्या अंबिका सोनी आणि मधुसूदन मिस्री यांनी आक्षेप घेतला होता, त्यांनी लष्कराच्या भूमिकेवरही टीका केली होती.