मिस्त्रींचा पलटवार!

By admin | Published: October 27, 2016 05:01 AM2016-10-27T05:01:45+5:302016-10-27T07:38:46+5:30

देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच

Mistri's counter-attack! | मिस्त्रींचा पलटवार!

मिस्त्रींचा पलटवार!

Next

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाच्या चेअरमन पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी आपली बाजू आक्रमकपणे मांडत असतानाच त्यांचे पूर्वसुरी व आताचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांच्यावर पलटवार करत, टाटा यांच्या अनाठायी लुडबुडीमुळे आपली अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती, असा गंभीर आरोप केला आहे.
सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५ आॅक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री १० वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.
मिस्त्री पत्रात म्हणतात की, सन २०११ मध्ये चेअरमनपदासाठी शोध घेऊनही कोणी लायक उमेदवार न मिळाल्याने रतन टाटा व लॉर्ड भट्टाचार्य यांनी आपल्याला हे पद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीस माझी तयारी नव्हती. परंतु नंतर टाटा समुहाच्या व्यापक हितासाठी मी तयार झालो.
ते पत्रात पुढे लिहितात, मला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन नियुक्तीपूर्वी देण्यात आले होते. आधीचे चेअरमन (रतन टाटा) बाजूला होणार होते व गरज पडेल तेव्हा सल्ला व मार्गदर्शनासाठी उपलब्ध होणार होते. माझ्या नियुक्तीनंतर कंपनीच्या ‘आर्टिकल्स आॅफ असोसिएशन’मध्ये बदल केले गेले. त्यामुळे टाटा ट्रस्ट््स, टाटा सन्सचे संचालक मंडळ व चेअरमन आणि समुहातील कंपन्या यांच्यातील परस्पर संबंधांचे गणित पार बदलून गेले. त्यानंतर या बदललेल्या नियमांचे चुकीचे अर्थ लावले गेले. परिणामी प्राप्त वित्तीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी समुहाने करायच्या प्रयत्नांवर मर्यादा आल्या.
याच अनुषंगाने पत्राच्या शेवटी संचालकांना उद्देशून मिस्त्री म्हणतात की, नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता. समुहाच्या भावी वाटचालीसाठी परिणामकारक अशा प्रशासन व्यवस्थेची रचना करणयाची माझी इच्छा होती. ते करीत असताना मी कंपनीचे हितच प्रामाणिकपणे जपले. तडकाफडकी पदावरून दूर केल्याने घोर निराशा झाली नाही, असे म्हणून मी खोटे बोलणार नाही. पण आता ज्या परिणामास सामोरे जावे लागत आहे त्याची तमा न बाळगता मी स्वाभिमान आणि प्रतिष्ठा कायम ठेवून माझ्या परीने सर्व प्रयत्न केले.
(विशेष प्रतिनिधी)

मिस्त्री पत्रात म्हणतात की, ‘असमाधानकारक कामगिरीमुळे मला दूर करण्यात आले, यावर माझा विश्वास नाही. विजय सिंग, फरिदा खंबाटा आणि रोनेन सेन या त्रयस्थ संचालकांचा समावेश असलेल्या ‘नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी’ने अलीकडेच माझ्या कामाचे कौतुक केले होते. (आणि) आता याच तीनपैकी दोन संचालकांनी मला दूर करण्याच्या बाजूने मत दिले आहे.’

बैठक थांबवून टाटांचा सल्ला
कंपनीवर नेमलेल्या त्रयस्थ संचालकांनी आपल्या स्वत:च्या विवेकबुद्धीने काम
करून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित
आहे, असे मी गृहीत धरतो, पण या संचालकांची अवस्था निव्वळ पोस्टमनसारखी झाली होती. उदा. टाटा सन्सच्या संचालक मंडळाची एक बैठक सुरू असताना, ट्रस्टने नेमलेले संचालक नितीन नोहरिया व विजय सिंग, इतरांना तासभर ताटकळत ठेवून, रतन टाटा यांच्याकडून सल्ला घेण्यासाठी बैठकीतून उठून गेले होते.

माझी अवस्था नामधारी चेअरमनसारखी झाली होती...
मला पदावरून दूर करण्याचा निर्णय झालेल्या २४ आॅक्टोबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे काही झाले, ते सर्व अवैध आणि बेकायदा असल्याने मला जो धक्का बसला. त्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारे निर्णय घेणे संचालक मंडळास शोभणारे नाही.
एका शब्दाचीही कारणमीमांसा न देता किंवा बचावाची अजिबात संधी न देता, चेअरमनला अशा प्रकारे बदलले जाणे हे कॉर्पोरेट इतिहासात न भुतो असेच असावे. हा निर्णय अशा तडकाफडकी घेतला जाणे व असे का केले, याचा कोणताही खुलासा न करणे, यामुळे ज्या नानाविध शंकाकुशंका वर्तविल्या जात आहेत, त्याने टाटा उद्योग समूहाच्या प्रतिष्ठेची अपरिमित हानी झाली आहे.
नामधारी चेअरमनसारखी अवस्था झाल्याने माझी किती कोंडी झाली असेल, हे आपण समजू शकता.

मोदी यांना भेटण्याची इच्छा : सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त असून, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 

Web Title: Mistri's counter-attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.