आता पाकिस्तानला बनावट नोटा छापणे अशक्य..!
By admin | Published: November 10, 2016 09:06 AM2016-11-10T09:06:45+5:302016-11-10T09:17:25+5:30
पाकिस्तान आणि अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय गटांसाठी आता भारतीय चलनातील नव्या नोटांच्या बनावट नोट छापणे अशक्य आहे
Next
ऑनलाइन लोकतम
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान आणि अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय गटांसाठी आता भारतीय चलनातील नव्या नोटांच्या बनावट नोट छापणे अशक्य आहे, असा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. एक प्रकारे गुप्तचर यंत्रणा 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या सुरक्षेबाबत हमी देत असल्याचे दिसत आहे. या नोटा बनवण्यासाठी जे सुरक्षेचे उपाय अमलात आणले गेले आहेत, त्यावरुन पाकिस्तानला या नोटांच्या बनावट नोटा बनवणे कठीण असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.
एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, संशोधन आणि विश्लेषण विंग, गुप्तचर विभाग आणि डीआरआय गेल्या 6 महिन्यांपासून छापण्यात येणा-या नोटांची गुप्तपणे चौकशी करत आहेत. मात्र, या नोटांवर किती प्रमाणात सिक्युरिटी फीचर्स उपलब्ध आहेत, याबाबची माहिती देण्यास या अधिका-याने नकार दिला आहे. पण, नव्या नोटांच्या बनावट नोटा बनवणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानातील पेशावरमध्ये एक खास कारखाना आहे, ज्यामध्ये केवळ बनावट भारतीय मुद्रा छापल्या जातात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकार आणि रिझर्व्ह बँकेला दिली होती. या कारखान्यात 500 आणि 1000 रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा छापल्या जातात. या कारखान्यातील काम पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या देखरेखीखाली चालत असल्याची माहिती आहे. आयएसआय दाऊद इब्राहिम, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गटांना आपल्या नेटवर्कद्वारे या बनावट नोटा भारतात पोहोचवते, अशी माहितीदेखील समोर आली आहे.