ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी वेगळ्या रांगा
By admin | Published: November 15, 2016 07:51 AM2016-11-15T07:51:51+5:302016-11-15T07:51:51+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल लक्षात घेत केंद्र सरकारला अत्यावश्यक ठिकाणी
नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर सर्वसामान्य लोकांचे झालेले हाल लक्षात घेत केंद्र सरकारला अत्यावश्यक ठिकाणी ह्या नोटा स्वीकारण्याची मुदत तिसऱ्यांदा वाढवावी लागली. रुग्णालये, पेट्रोल पंप, टोलनाके आणि रेल्वे स्टेशन, विमान प्रवास यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येतील.
येत्या काही दिवसांत सर्वत्र पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव शक्तिकांता दास यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमवारी दिली.
दास म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांनी गोंधळून वा घाबरून जाण्याचे कारण नाही. रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोख रक्कम उपलब्ध आहे. फक्त वितरणात अडचणी येत असून, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसांत सुधारेल.
पोस्ट आॅफिसांत अधिकाधिक रोख उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जनतेचे हाल लक्षात घेत, तेथील बँका व पोस्टातील रोख रकमेच्या पुरवठ्यातही वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक विशेष पथक तयार करीत आहे. नव्या रकमेच्या आणि आकाराच्या नोटा एटीएममधून सहज मिळाव्यात, यासाठी एटीएमच्या रचनेत करण्यात येत असलेले तांत्रिक बदल पुढच्या काही दिवसांत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अर्थ सचिव म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना बँका, एटीएम वा पोस्ट आॅफिसमधून पैसे काढणे सोपे व्हावे, यासाठी तिथे वेगळ्या रांगा लावण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.