VIDEO : अदानी, अंबानींना नोटाबंदीची पूर्वकल्पना होती - भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट
By admin | Published: November 17, 2016 10:20 AM2016-11-17T10:20:24+5:302016-11-17T10:43:14+5:30
अदानी आणि अंबांनी यांसारख्या उद्योगपतींना सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या चलनातून रद्द होणार असल्याचा निर्णय आधीपासूनच माहिती होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच एका आमदाराने केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 17 - अदानी आणि अंबांनींसारख्या उद्योगपतींना केंद्र सरकारच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द होणार असल्याचा निर्णय आधीपासूनच माहिती होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच एका आमदाराने केला आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील भाजपाचे आमदार भवानी सिंह राजावत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
बुधवारी सोशल मीडियावर भवानी सिंह राजावत यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला. 'अदानी, अंबानी यांसारख्या उद्योगपतींना नोटाबंदीचा निर्णय आधीपासूनच माहिती होता. याबाबत त्यांना अप्रत्यक्ष सूचना दिली गेली. त्यामुळे निर्णयाची घोषणा होण्याआधीच त्यांनी योग्य व्यवस्था केली होती. तसेच नवीन 2000 रुपयांच्या नोटेचा दर्जा अत्यंत खराब असून ती बनावट दिसते', असे भवानी सिंह राजावत संबंधित व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कालच (बुधवारी) नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांचा पैसा बड्या उद्योगपतींना कर्जमाफी देण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यात, भाजपाच्याच आमदाराचा हा कथित व्हिडीओ समोर आल्याने नोटाबंदी निर्णयामुळे केंद्र सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, मी काही पत्रकारांशी अनौपचारिक संवाद करत होतो. तसेच या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे सांगत राजावत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. व्हिडीओमध्ये जसे दिसत आहे, तसे मी काही बोललो नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी नोटाबंदी निर्णयाविरोधात विरोधकांनी एकजूट दाखवत सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यात आता भाजपाच्याच आमदाराचा हा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने संसदेत यावर आणखी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#WATCH: BJP MLA from Rajasthan's Kota Bhawani Singh claims Ambani & Adani had prior knowledge of the #DeMonetisation of Rs 500 & 1,000 notes pic.twitter.com/L8FRp1NofD
— ANI (@ANI_news) 17 November 2016
Adani, Ambani & attram shattram ko pehle hi pata tha, hint de diya gaya tha: BJP MLA from Rajasthan's Kota Bhawani Singh #DeMonetisationpic.twitter.com/lc9cjVPFRs
— ANI (@ANI_news) 17 November 2016