यादव पिता-पुत्राची 'दंगल' नियोजित? व्हायरल ई-मेलवरुन सवाल
By admin | Published: December 31, 2016 10:12 AM2016-12-31T10:12:05+5:302016-12-31T10:21:54+5:30
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षात सुरू असलेली 'दंगल' ही नियोजित असल्याचे म्हटले जात आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षात सुरू असलेली 'दंगल' ही नियोजित असल्याचे म्हटले जात आहे. कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे राजकीय सल्लागार स्टीव्ह जॉर्डिंग यांनी 24 जुलै रोजी पाठवलेला कथित ई-मेल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरुन समाजवादी पक्षातील यादवी आधीच ठरवण्यात आलेली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शुक्रवारी मुलायमसिंग यादव यांनी आपला मुलगा अखिलेशची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर काही वेळातच स्टीव्ह जॉर्डिंग यांचा कथित मेलप्रकरण समोर आले, आणि पाहता पाहता हा मेल सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला.
व्हायरल झालेल्या ई-मेलच्या स्क्रीनशॉटवरुन समाजवादी पक्षात सुरू असलेला वाद राज्यातील आगामी निवडणुकांसंदर्भातील रणनीती म्हणून आखण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावरुन अखिलेश यांची स्वच्छ प्रतिमेला आणखी बळकट बनवून त्यांना आगामी काळात पक्षाचा नेता म्हणून पुढे आणलं जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, 'संबंधित मेल खोटा असून यामुळे आधीच सुरू असलेल्या वादात पक्ष आणखी अडचणीत येऊ शकतो,' असे स्पष्टीकरण स्टीव्ह अँट पार्टनर्स कंपनीने दिले आहे. तसेच अखिलेश यादव यांच्यासोबत ऑगस्ट महिन्यापासून काम करायला सुरुवात केली असून व्हायरल झालेला मेल 24 जुलैचा असल्याचे सांगत कंपनीने याविरोधात संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करू असेही सांगितले.