सैन्यातही अन्यायाची खदखद
By admin | Published: January 14, 2017 01:58 AM2017-01-14T01:58:21+5:302017-01-14T01:58:21+5:30
बीएसएफचा आणि सीआरपीएफच्या जवानानंतर आता भारतीय लष्कराच्या जवानानेही व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिकारी
नवी दिल्ली : बीएसएफचा आणि सीआरपीएफच्या जवानानंतर आता भारतीय लष्कराच्या जवानानेही व्हिडीओ पोस्ट करून वरिष्ठ अधिकारी जवानांचा कसा छळ करतात याचा पाढा वाचला आहे.
डेहरादून येथे तैनात लान्स नायक यज्ञ प्रताप सिंह या जवानाने व्हिडीओत म्हटले आहे की, लष्कराच्या अनेक छावण्यांत वरिष्ठ अधिकारी जवानांकडून बुट पॉलिश, कपडे धुणे व पाळीव कुत्र्याला फिरविणे यासारखी कामे करून घेतात. सिंह यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवून तक्रार केली होती. त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा प्रचंड छळ केला. त्यामुळे सिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे.
आपल्या या पावलानंतर आता आपले कोर्टमार्शल केले जाते की काय, अशी भीती सतावत असल्याचे सिंह याने व्हिडीओत म्हटले आहे. सिंह यांच्या व्हिडीओवर भारतीय लष्कराची प्रतिक्रियाही आली आहे.
जवानाच्या तक्रारीची दखल घेण्यात येत असून अशा तक्रारींच्या निपटाऱ्याची लष्कराकडे स्वतंत्र प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे सिंह यांच्या तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे लष्कराने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आरोपांत तथ्य
गुरुवारी सीआरपीएफच्या जवानाने व्हिडीओ व्हायरल करून आपल्या समस्या मांडल्या होत्या. तत्पूर्वी बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव याने फेसबूकवर काही व्हिडीओ शेअर करून नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याचा आरोप केला होता.
सरकारकडून जवानांसाठी पुरेसे रेशन पाठविले जाते. तथापि, अधिकारी त्याची परस्पर विल्हेवाट लावत असल्यामुळे जवानांना निकृष्ट अन्नावर दिवस कंठावे लागत असल्याचे यादव याने व्हिडीओत म्हटले होते.
च्एका इंग्रजी दैनिकाने बीएसएफचे अधिकारी जवानांचे रेशन छावणीजवळील दुकानदारांना कमी दरात विकत असल्याचे समोर आणले होते. गृह मंत्रालयानेही जवानांच्या अन्नाबाबत काही मुद्दे असल्याचे सांगून यादव यांच्या आरोपांत तथ्यांश असल्याची अप्रत्यक्ष कबूली दिली आहे.
१६ जानेवारीला सुनावणी
जवानांना निकृष्ठ दर्जाचे अन्न देण्यात येत असल्याच्या आरोपाबाबत गृह मंत्रालयाकडून स्थितीदर्शक अहवालाची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय १६ जानेवारी रोजी सुनावणी करणार आहे.
शुक्रवारी सुनावणी न होऊ शकल्यामुळे मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने
सुनावणीसाठी १६ जानेवारी ही तारिख निश्चित केली आहे.
बीएसएफचा जवान तेज बहादूर यादव याने फेसबूकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी पुरण चंद आर्य यांनी ही याचिका दाखल केलेली आहे.