पंजाबमध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री?
By admin | Published: January 17, 2017 05:25 AM2017-01-17T05:25:13+5:302017-01-17T05:25:13+5:30
नवज्योत सिंग सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पंजाबमधील या पक्षातील मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेला आला
व्यंकटेश केसरी,
नवी दिल्ली- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर पंजाबमधील या पक्षातील मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेला आला आहे. कारण, या पदासाठी आपण शर्यतीत आहोत याला सिद्धू यांनी नकार दिला नाही, तर पक्ष नेतृत्व यावर निर्णय घेईल, असा षटकारही त्यांनी लगावला. तथापि, काँग्रेस ‘कौसल्या’, तर भाजप ‘कैकयी’ आहे अशी तुफान फटकेबाजीही त्यांनी केली.
याच मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नावर सिद्धू म्हणाले की, ‘गेहू खेत में, बेटा पेट में और तुम ब्याह की तैयारी कर रहे हो.’ दरम्यान, राजकारणात जर तर याला काही स्थान नाही. ‘जर, परंतु’ आता विसरा. फक्त सिद्धू ‘जाट’लक्षात ठेवा अशी फिरकीही त्यांनी घेतली. मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग यांच्याशी तुलनेचा प्रश्न उपस्थित केला असता सिद्धू म्हणाले की, जर बिहारमध्ये लालूप्रसाद आणि नितीशकुमार एकत्र येऊ शकतात, तर पंजाबमध्ये मी आणि अमरिंदर सिंग का नाही? काँग्रेस हायकमांडने सांगितले तर आपण कुणाच्याही नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्या दिवशी येथे पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी शेरोशायरी करीत कार्यक्रमात हास्याचेही फवारे उडविले. या निवडणुकीत अकाली दल हेच प्रमुख प्रतिद्वंद्वी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना महत्त्व नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोदींबाबत विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधानांबाबत तर जनताच काय ते बोलेल. काँग्रेस हे आपले मूळ आहे हे सांगणाऱ्या सिद्धू यांना मात्र याचा खुलासा करता आला नाही की, या मूळ पक्षात येण्यास एवढा उशीर का केला. आपसोबत चर्चा करण्यातही त्यांचा बराच वेळ गेला; पण केजरीवाल यांचा हवाला देऊन ते म्हणाले, त्यांनी तर सांगितले होते की, ‘सिद्धू यांनी मला काहीही मागितले नाही.’
>हल्लाबोल
सिद्धू यांनी भाजपचा उल्लेख ‘कैकयी’ असा केला, तर काँग्रेसला ‘कौसल्या’ असे संबोधले. (रामाची सावत्र आई आणि आई) ते म्हणाले की, मी पक्षाला आई समजतो; पण आई तर कैकयीसुद्धा होती. जी वनवासाला पाठवत होती; पण माता कौसल्या पुन्हा बोलावून सत्ता देते. आता कैकयी कोण आणि कौसल्या कोण, ते आपणच ठरवा.
षडयंत्र करणारी ‘मंथरा’ कोण आहे? असा सवाल केला असता ज्या पक्षाने बाहेर पडण्यास भाग पाडले, त्या भाजपवर सिद्धू यांनी पुन्हा हल्लाबोल केला.
आपण जन्मत:च काँग्रेसचे आहोत. आपले वडील सरदार भवंतसिंग सिद्धू यांनी ४० वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. ते विधानसभा, विधान परिषदेचे सदस्यही होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध त्यांनी संघर्ष केला होता, असेही ते म्हणाले.