‘महाराष्ट्र केडर’चे सतीश माथूर सीबीआयचे नवे प्रमुख?

By admin | Published: January 18, 2017 05:39 AM2017-01-18T05:39:25+5:302017-01-18T05:39:25+5:30

सीबीआय संचालकपदासाठी ज्यांचा विचार होईल, त्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर आहेत.

Satish Mathur of Maharashtra cadre is the new head of the CBI? | ‘महाराष्ट्र केडर’चे सतीश माथूर सीबीआयचे नवे प्रमुख?

‘महाराष्ट्र केडर’चे सतीश माथूर सीबीआयचे नवे प्रमुख?

Next

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- सीबीआय संचालकपदासाठी ज्यांचा विचार होईल, त्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर आहेत. या पदासाठी ४० पेक्षा जास्त आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश जे. एस. केहार आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उच्चाधिकार समितीने ही नावे निश्चित केली होती.
१९८१ च्या आयपीएस तुकडीतील महाराष्ट्र केडरचे सतीश माथूर, दिल्लीचे पोलीस आयुक्त (१९७९ ची तुकडी) आलोक वर्मा आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील विशेष सचिव आर.के. दत्ता यांची नावेही विचाराधीन आहेत. वर्मा हे तीन जणांत अत्यंत वरिष्ठ असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जवळचे समजले जातात. सरकारने वर्मा यांच्या नावाचा विचार केला तर माझी असहमती नोंदवली जावी, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांना सांगितले आहे. खरगे यांच्या मते वर्मा यांना सीबीआयचे कामकाज व चौकशी याचा अनुभव नाही. मी वर्मा यांच्याविरोधात नाही. परंतु नियमांचे पालन झाले पाहिजे, असे खरगे यांनी म्हटले आहे. सीबीआयमधून आर. के. दत्ता यांना अचानक दूर करून आणि गुजरात केडरचे कनिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना यांना सीबीआयचे हंगामी संचालक बनवून सरकारने हात चांगलेच पोळून घेतल्यामुळे सीबीआयच्या संचालकाची निवड करताना कोणताही वाद निर्माण होऊ नये असे सरकारला वाटत आहे. त्यामुळे सरकार एक तर वर्मा किंवा माथूर यांच्यापैकी एकाला निवडू शकते. दत्ता यांना सीबीआयच्या संचालकपदी परत आणले जाणार नाही, हेही स्पष्ट आहे. माथूर यांना सीबीआयचे संचालक म्हणून आणले जाऊ शकते का याचा अभ्यास सरकार करीत आहे. माथूर यांनी सीबीआयमध्ये काम केले होते आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशीही केली होती. सशस्त्र सेना बलच्या महासंचालक अर्चना रामसुंदरम आणि पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांना तीन सदस्यांच्या निवड समितीची पसंती नव्हती.

Web Title: Satish Mathur of Maharashtra cadre is the new head of the CBI?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.