सपा-काँग्रेस एकत्र!
By admin | Published: January 23, 2017 03:42 AM2017-01-23T03:42:16+5:302017-01-23T03:42:16+5:30
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची अखेर उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम व काँग्रेसचे
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची अखेर उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली. सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी संयुक्त पत्रपरिषदेत ही घोषणा केली.
आघाडीच्या जागा वाटपात कोण किती जागा लढणार, याचे अधिकृत आकडे पत्रपरिषदेत जाहीर करण्यात आले नाहीत मात्र काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या ४0३ जागांपैकी २९८ जागा अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष लढवणार आहे तर काँग्रेसच्या वाट्याला १0५ जागा आल्या आहेत.
समाजवादी आणि काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटपावरून बरीच ओढाताण सुरू होती. काँग्रेसची मागणी १२0 जागांची होती तर अखिलेश यादव १00 पेक्षा अधिक जागा देण्यास तयार नव्हते. काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या काही जागांवरही समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केल्यामुळे तणाव आणखी वाढला होता. जागा वाटपाची कोंडी दूर होण्याची शक्यता दिसत नसल्याने, राष्ट्रीय पक्षाची आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारीही चालवली होती.
‘सायकली’वरून असे बदलत गेले जागांचे गणित
काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत अखिलेश यादवांना सायकल हे निवडणूक चिन्ह मिळाले नव्हते, तोपर्यंत काँग्रेसला १४२ जागा देण्याची तयारी अखिलेशनी दाखवली होती. निवडणूक आयोगाने सायकल चिन्हासह समाजवादी पक्षाची सूत्रे अखिलेशच्या हाती सोपवल्यानंतर मात्र आपल्या अडचणी कथन करीत अखिलेश यादवांनी काँग्रेसला १२१ जागा देऊ केल्या.
काँग्रेसने या आॅफरलाही होकार दिल्यानंतर अखिलेश यादव यांनी मुलायमसिंगांच्या उमेदवारांना सामावून घ्यायचे आहे, असे कारण पुढे करीत काँग्रेसला जास्तीत जास्त १00 जागा देण्याची तयारी दर्शवली.
तेव्हा केवळ आघाडी तुटू नये म्हणून अखिलेशची विनंती काहीशा नाखुशीनेच मान्य करीत काँग्रेसने ११0 जागांवर निवडणूक लढवण्याचे ठरवले मात्र तरीही तिढा संपत नव्हता.