शिवपाल यादव काढणार नवा पक्ष
By admin | Published: February 1, 2017 01:33 AM2017-02-01T01:33:16+5:302017-02-01T01:33:16+5:30
स्वपक्षीयांकडून सातत्याने हल्ले होत असल्यामुळे नाराज सपा नेते शिवपाल यादव विधानसभा निवडणुकीनंतर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. शिवपाल हे सपाचे
नवी दिल्ली : स्वपक्षीयांकडून सातत्याने हल्ले होत असल्यामुळे नाराज सपा नेते शिवपाल यादव विधानसभा निवडणुकीनंतर नवा पक्ष स्थापन करणार आहेत. शिवपाल हे सपाचे संस्थापक प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे बंधू असून, विधानसभा निवडणुकीनंतर ११ मार्च रोजी ते नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवतील.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी पटत नसल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखिलेश हे मुलायमसिंह यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. तथापि, मुलायमसिंह अखिलेशच्या सपात सामील होतात की, शिवपाल यांच्या पक्षाची निवड करतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘नेताजी आणि माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ नेताजींमुळे, असे म्हणणारे लोकच आता त्यांचा अवमान करीत आहेत, असे शिवपाल
म्हणाले. तत्पूर्वी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवपाल
यांनी सपाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.
सपातील दुफळी सप्टेंबरमध्ये समोर आली होती. एकीकडे मुलायम आणि त्यांचे बंधू शिवपाल, तर दुसरीकडे मुलायम यांचे पुत्र अखिलेश आणि मुलायम यांचे चुलतभाऊ राम गोपाल यादव, असा संघर्ष पेटला होता.
दरम्यानच्या काळात समेटाचे अनेक प्रयत्न झाले. मतभेद दूर झाल्याचे सांगितले गेले. तथापि, सर्वकाही आलबेल नव्हते. दोन्ही गट सायकल या निवडणूक चिन्हासाठी आयोगाकडे गेल्यानंतर वाद समेटाच्या पलीकडे गेला असल्याचे स्पष्ट झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुलायमसिंग करणार प्रचार?
- निवडणूक आयोगाने अखिलेश यांच्या गटाला सायकल हे निवडणूक चिन्ह दिले. नाराज मुलायम गटाने शांत राहण्याचा पवित्रा घेतला. सर्वांना वाटले बहुधा समेट झाला असावा. मात्र, ही समजूत तात्कालिक ठरली.
- अखिलेख यांनी काँग्रेससोबत युतीची घोषणा केल्यानंतर संतप्त मुलायमसिंह यांनी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. सपाने काँग्रेसशी युती करण्यास मुलायमसिंह यांचा विरोध आहे.
- काँग्रेससोबत युती करणे पक्षासाठी हानिकारक असल्याचे मुलायमसिंह यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असे ते म्हणत असले तरी अखिलेश यांना मात्र वडील सपा-काँग्रेस युतीचा प्रचार करतील, असे वाटते.